
Amit Shah : मणिपूरची दहशतवाद, बंदपासून मुक्तता; अमित शहा
इम्फाळ : भाजप सरकारने मणिपूरला बंद आणि दहशतवादापासून मुक्त करून विकासाच्या मार्गावर आणले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. मणिपूरमधील बिश्नपूर जिल्ह्यातील मोईरंगमध्ये सभेला आभासी पद्धतीने संबोधित करताना शहा बोलत होते.
तत्पूर्वी, त्यांच्या हस्ते सुमारे ३०० कोटींच्या १२ प्रकल्पांचे उद्घाटन तसेच १,००७ कोटींच्या इतर नऊ प्रकल्पांचे भूमिपूजनही झाले. अमित शहा यावेळी म्हणाले, की मणिपूरमध्ये भाजप सरकारने घुसखोरी संपविली. तसेच राज्यातील सहा जिल्ह्यांतून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा १९५८ किंवा अफ्सा मागे घेतला.
मणिपूरमध्ये काँग्रेस सरकारच्या काळात दहशतवाद होता. मात्र, आता सर्वांत चांगले शासन असणाऱ्या छोट्या राज्यांत मणिपूरचा समावेश होतो. गेल्या आठ वर्षांच्या काळात केंद्रातील भाजप नेतृत्वाखालील सरकारने ईशान्येतील राज्यांत सुमारे ३.४५ लाख कोटींची गुंतवणूक केली. त्याचप्रमाणे, या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५१ वेळा ईशान्येला भेट दिली, असेही त्यांनी नमूद केले.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बीरेनसिंह यांचे सरकारने राज्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहे. पुढील निवडणुकीपर्यंत भाजप मणिपूरला अमली पदार्थांपासून मुक्त करेल, असे आश्वासनही शहा यांनी दिले.
शहा यांनी विविध प्रकल्पांचे उद्घाटन तसेच ४० पोलिस चौक्यांची पायाभरणीही केली. त्यापैकी ३४ चौक्या भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेवर तर उर्वरित ६ चौक्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३७ वर असतील.
या प्रकल्पांचे उद्घाटन
मणिपूर ऑलिम्पियन पार्क
‘जेएनआयएमएस’मध्ये सशुल्क खासगी वॉर्ड
मोरेह शहराची पाणीपुरवठा योजना
नोंगपोक थोंग पूल
कांगखुई गुहेतील गुहा पर्यटन प्रकल्प