esakal | अमित शहा, येडियुराप्पांकडून पुरग्रस्तभागाची हवाई पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

अमित शहा, येडियुराप्पांकडून पुरग्रस्तभागाची हवाई पाहणी

बेळगाव - अतिवृष्टी व महापुरामुळे कर्नाटकात सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने तीन हजार कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज बेळगावात दिली. 

अमित शहा, येडियुराप्पांकडून पुरग्रस्तभागाची हवाई पाहणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - अतिवृष्टी व महापुरामुळे कर्नाटकात सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने तीन हजार कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज बेळगावात दिली. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पूरग्रस्त बेळगाव, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासह कोयना जलाशय परिसराची हवाई पाहणी केली. दुपारी साडेचारला त्यांनी पाहणीसाठी सांबरा विमानतळावरून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले. सुमारे दोन तास दहा मिनिटे त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते सांबरा विमानतळावर परतले.

विमानतळावरच त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा, संसदीय व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी व राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संभाव्य उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी बैठकीचा तपशील सादर केला. 

पुरामुळे दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पूरस्थिती निवारणार्थ तातडीने तीन हजार कोटी रुपयांची गरज आहे. केंद्राने हा निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी गृहमंत्री शहा यांच्याकडे करण्यात आली. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यासंदर्भात चर्चेसाठी 16 ऑगस्टला दिल्लीत बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीतच निधीबाबत अंतिम निर्णय होईल. तत्पूर्वी, गृहमंत्री पुढील दोन दिवस सहा ते सात जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत, असे येडियुराप्पांनी सांगितले. बैठकीला खासदार प्रभाकर कोरे, आमदार उमेश कत्ती, महांतेश कवठगीमठ आदी उपस्थित होते. 

कोल्हापूर, सांगलीसह बेळगावची पाहणी 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगाव, चिक्कोडी, कोयना धरण, दूधगंगा, वेदगंगा, हिडकल डॅम, मार्कंडेय आणि कृष्णा नदीच्या पूरस्थितीची पाहणी केली. तसेच, महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीचाही अंदाज घेतला. 

मंत्रिमंडळ विस्तारीकरणावर बैठक 
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भात 16 ऑगस्टला दिल्लीतच चर्चा करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. त्यामुळे 16 ऑगस्टनंतर दोन दिवस दिल्लीत थांबून मदतनिधी व मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  

loading image