स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच होणार एका महिलेला फाशी; प्रेमासाठी 7 जणांची कुऱ्हाडीने हत्या

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 February 2021

आजवर एकाही महिलेला फाशी दिल्याची घटना स्वतंत्र भारतात घडली नाहीये.

मथुरा : भारत लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे इथे ना-ना प्रकारचे लोक आढळून येतात. गुन्हेगारीचं प्रमाणदेखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या गुन्ह्यांचं प्रमाण तसं कमीच आहे. मात्र, असं असलं तरीही आजवर एकाही महिलेला फाशी दिल्याची घटना स्वतंत्र भारतात घडली नाहीये. मात्र आता स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फासावर लटकवलं जाण्याची घटना घडणार आहे. उत्तर प्रदेशातील मथुरामधील एकमेव अशा फाशीघरामध्ये अमरोहाची रहिवासी असलेल्या शबनमला मृत्युदंड दिला जाणार आहे. याबाबतची तयारी सध्या सुरु आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना फासावर लटकावणाऱ्या मेरठच्या पवन जल्लाद यांनी देखील दोनवेळा फाशीघराचं निरीक्षण केलं आहे. मात्र, अद्याप या फाशीची तारीख निश्चित झाली नाहीये. 

शबनमचा काय होता गुन्हा?

अमरोहामध्ये राहणाऱ्या शबनमने एप्रिल 2008 मध्ये आपल्या प्रियकराच्या सोबतीने आपल्या सात नातेवाईकांची कुऱ्हाडीने निर्दयीपणाने हत्या केली होती. अमरोहातील बावनखेडीमध्ये 2008 मध्ये ही खुनाची नृशंस घटना घडली होती. यावेळी शबनमने आपला प्रियकर सलीमसोबत आपले वडील मास्टर शौकत, आई हाशमी, भाऊ अनिस आणि राशिद यांच्यासह आणखी तिघा नातेवाईकांची  हत्या केली होती. हे सगळे त्यांच्या प्रेमाच्या आड येत होते. सध्या शबनम बरेली तर सलीम आगरा जेलमध्ये आहे. या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने शबनमची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. राष्ट्रपतींनी देखील तिच्या दयेचा अर्ज नाकारला होता. मात्र, भारतीय स्वातंत्र्यानंतर शबनम ही पहिली महिला गुन्हेगार असेल जिला फासावर चढवलं जाणार आहे. 

हेही वाचा - तब्बल एका वर्षानंतर दिसून आली किम जोंग उनची बायको; गर्भवती असल्याच्या चर्चा

आतापर्यंत एकाही महिलेला फाशी नाही
भारतातील महिलांना फाशी देण्याचं एकमेव ठिकाण मथुरेत आहे. मात्र याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. कारण अद्याप इथे कुणालाच फाशी दिली गेली नाहीये. याचं बांधकाम ब्रिटीश काळात 1870 मध्ये करण्यात आलं होतं. मथुरा जेलमध्ये 150 वर्षांपूर्वी महिला फाशीघर बनवलं गेलं होतं. मात्र, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कोणत्याही महिलेला फाशीची शिक्षा दिली गेली नाहीये. वरिष्ठ जेल अधिक्षक शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी म्हटलं की अद्याप तरी फाशीची तारीख निश्चित नाहीये. मात्र आम्ही तयारी सुरु केली आहे. डेथ वारंट जारी केल्याबरोबर शबनमला फाशी देण्यात येईल. 

बिहारहून मागवली जाईल रस्सी
जेल अधिक्षकांच्या मते पवन जल्लाद यांनी फाशीघराचे दोनवेळा निरिक्षण केलं आहे. त्यांना काही बाबींमध्ये कमतरता आढळल्यानंतर त्या दुरुस्त केल्या जात आहेत. बिहारच्या बक्कसरमधून फाशीसाठी रस्सी मागवली जात आहे. जर शेवटच्या क्षणी काही अडचण उद्भवली नाहीच तर शबनम ही भारतातील अशी पहिली महिला ठरेल जिला स्वातंत्र्यानंतर फाशी दिली जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amroha murder case shabnam first woman independent india to be hanged