Hathras Stamped : विश्‍वहरी भोलेबाबाच्या आश्रमात पोलिस धडकले;बाबांचा थांगपत्ता नसल्याने स्वयंसेवकात संतापाची लाट; सर्व मृतांची ओळख पटली

हाथरस येथील चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू झाला असून बुधवारी रात्री पोलिसांनी स्वयंघोषित जगद्गुरू साकार विश्‍वहरी भोलेबाबांच्या आश्रमांला भेट दिली. बाबांचे ‘एफआयआर’मध्ये नाव नसले तरी गरज भासल्यास त्यांची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले.
Hathras Stamped
Hathras Stampedsakal
Updated on

मैनपुरी (उत्तर प्रदेश) : हाथरस येथील चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू झाला असून बुधवारी रात्री पोलिसांनी स्वयंघोषित जगद्गुरू साकार विश्‍वहरी भोलेबाबांच्या आश्रमांला भेट दिली. बाबांचे ‘एफआयआर’मध्ये नाव नसले तरी गरज भासल्यास त्यांची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले. आम्ही केवळ आश्रमाच्या परिसरातील बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी गेलो होतो, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, १२१ मृतदेहांचे विच्छेदन पूर्ण झाले सर्वांची ओळख पटली आहे.

हाथरसप्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरू केला आहे. यात बाबाचे थेट नाव आलेले नाही. यासंदर्भात मंडळ अधिकारी सुनील कुमार सिंह म्हणाले, पोलिस आणि विशेष मोहीम पथकाचे (एसओजी) कर्मचारी काल रात्री आश्रमात गेले होते. चौकशीदरम्यान आश्रमात महिलांसह ५० ते ६० स्वयंसेवक होते. यावेळी बाबा आश्रमात होते की नाही असे पोलिसांना विचारले असता बाबा कालही नव्हते आणि आजही नाहीत, असे उत्तर दिले. मैनपुरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल मिठास यांनी चौकशीच्या वेळी भोलेबाबा आश्रमात दिसले नाहीत, असे सांगितले. मग पोलिस कर्मचारी आश्रमात का घुसले? असे विचारले असता ते म्हणाले, आम्ही तपास करण्यासाठी नाही तर सुरक्षेची तपासणी करण्यासाठी गेलो होतो. उत्तर प्रदेश सरकारने हाथरसच्या दुर्घटनेनंतर तपासासाठी उच्च न्यायालयाच्या एका सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय न्यायिक आयोगाची नियुक्ती केली आहे. या चेंगराचेंगरीमागे कारस्थान तर नाही ना? याचा तपास केला जात असल्याचे ते म्हणाले. समितीकडून दोन महिन्यांत अहवाल दिला जाणार आहे. पोलिसांनी हाथरसच्या फुलहारी गावाजवळ सत्संगाचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ८० हजाराची परवानगी असताना अडीच लाख लोकांना गोळा केल्याचा संयोजकावर आरोप आहे.

दोन दिवसांपूर्वी सिकंदरा राऊ पोलिस ठाण्यात मुख्य स्वयंसेवक देवप्रकाश मधुकर आणि अन्य आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जगद्गुरू साकार विश्‍वहरी भोलेबाबा यांचे नाव आरोपीच्या यादीत नाही. काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरसला भेट दिली आणि त्यांनी जखमींची विचारपूस केली. यावेळी प्रवचनकाराचे नाव एफआयआरमध्ये का नाही? अशी विचारणा केली असता ते म्हणाले, प्रथमदृष्ट्या कार्यक्रमाची परवानगी घेतलेल्या आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट केले.

अद्याप अनेकजण बेपत्ता

सत्संगानंतरच्या चेंगराचेंगरीत बेपत्ता झालेले काही जणांना अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. ऊर्मिला देवी या आपल्या १६ वर्षाच्या नातीसमवेत सत्संगाला आल्या होत्या. मात्र चेंगराचेंगरीच्या वेळी दोघींची ताटातूट झाली. त्या रात्रीपासून वयस्कर उर्मिला देवी यांनी हाथरस, एटा जिल्हा रुग्णालयात शोधाशोध केला, मात्र नातीचा शोध लागला नाही. ऊर्मिला देवी यांच्याकडे फोन नाही. मी ओळखीच्या व्यक्तीमार्फत मोठ्या मुलाला निरोप पाठविला आहे. पण त्याला मुलगी बेपत्ता झाल्याचे कळाले आहे की नाही, मला अद्याप ठाऊक नसल्याचे त्या म्हणाल्या.

स्वयंघोषित बाबाचे फाडले पोस्टर

स्वयंघोषित भोलेबाबा मंडपातून बाहेर पडत असताना त्यांचे शिष्य त्यांच्या पायाची धूळ गोळा करण्यासाठी पळाले, मात्र भोलेबाबांच्या सुरक्षा रक्षकांनी काही शिष्यांना मागे ढकलले आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दोन दिवसानंतरही भोलेबाबा बेपत्ता आहेत. त्यांनी एका अज्ञात ठिकाणाहून एक संदेश देखील दिला. त्यांच्या वकिलांनी तपासकामात सहकार्य करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. दुसरीकडे काही शिष्य रुग्णालयात असून ते बाबाविरोधात संताप व्यक्त करत आहेत. बाबाकडे खरीच शक्ती असेल आणि त्यांना आमची काळजी असेल तर त्यांनी इथे येऊन आम्हाला बरे करावे. उपचारासाठी त्यांची मदत हवी आहे. एका महिलेचा हात या धावपळीत मोडला. तिचा पाच वर्षाचा नातू देखील जखमी झाला आहे आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हाथरसचा रहिवासी विनोदने आपल्या घरातील भोलेबाबाचे पोस्टर फाडून टाकले. कारण त्यांनी या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबाला गमावले. आई जया, पत्नी राजकुमारी आणि मुलगी भूमी यांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. विनोदला बोलताना शोक अनावर झाला. तो म्हणाला, ‘मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो. मला सायंकाळी चेंगराचेंगरीचे कळाले. घरी आलो तेव्हा सर्वच गेल्याचे ऐकून धक्काच बसला.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.