esakal | कॅबिनेटच्या बैठकीत शेतकरी, आरोग्य सेवांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Mandviya_Tomar

कॅबिनेटच्या बैठकीत शेतकरी, आरोग्य सेवांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या केंद्रातील नव्या कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत देशातील दोन समस्यांबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी १ लाख कोटीचं पॅकेज तर आरोग्य सेवेसाठी २३ हजार कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. या दोन्ही खात्यांचे मंत्री अनुक्रमे नरेंद्रसिंह तोमर आणि मनसुख मांडवीय यांनी याची माहिती दिली.

केंद्रीय कृषी मंत्री तोमर म्हणाले, नव्या कृषी कायद्यांची अंमलबजावणी केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांना केंद्राच्या पायाभूत सुविधा निधीतून कोट्यवधी रुपये देण्यात आले. यामुळे बाजार समित्यांचं सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळणार आहे. बाजार समित्यांना अधिक संसाधनं उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आत्मनिर्भत भारत योजनेतून शेतकरी पायाभूत निधीला एक लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत. हा निधी बाजारसमित्यांनी वापरायचा आहे. त्यामुळे मी आंदोलक शेतकऱ्यांना आवाहन करतो की, त्यांनी आपलं आंदोलन थांबवावं त्यासाठी चर्चेत सहभागी व्हावं. सरकार तुमच्याशी चर्चेसाठी तयार आहे.

तसेच नवे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय म्हणाले, "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या अडचणींशी मुकाबला करण्यासाठी २३ हजार कोटी रुपये देण्यात येत आहेत. या निधीचा वापर केंद्र आणि राज्य सरकार यांना मिळून करायचा आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन लहान मुलांसाठी ७३६ जिल्ह्यांमध्ये आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये २०,००० आयसीयू बेडही निर्माण केले जातील.

आपल्याला कोविडविरोधात मिळून लढा द्यायचा आहे. जास्तीत जास्त ९ महिन्यांचा कालावधी आहे. पण यावर आपल्याला लवकरात लवकर मात करायची आहे. राज्य सरकारांची यासाठी महत्वाची जबाबदारी आहे. शक्य त्या प्रकारे राज्यांना मदत करणं ही आपली जबाबदारी आहे, असंही आरोग्यमंत्री मांडवीय यांनी म्हटलं आहे.

loading image