प्रशांत भूषण यांना १ रुपयाचा दंड ठोठावल्यानंतर काय म्हणाले प्रकाश राज आणि अनुपम खेर? नक्की वाचा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 31 August 2020

ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांना न्यायालयाने एक रुपयाचा दंड ठोठावला आहे.

नवी दिल्ली- ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांना न्यायालयाने एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे आणि सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) यांच्या अवमानाप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर देशभरातून त्यांच्या शिक्षेवर प्रतिक्रिया येत आहेत. चित्रपटसृष्टीतील दोन प्रसिद्ध कलाकारांनी यासंदर्भात केलेले ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनुपम खेर आणि प्रकाश राज यांनी न्यायालयाने प्रशांत भूषण यांना शिक्षा सुनावण्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

असंघटित क्षेत्र संपवण्याचा मोदी सरकारचा डाव; राहुल गांधींचा गंभीर आरोप

अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन करत प्रशांत भूषण यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'सर्वोच्च न्यायालयाने या व्यक्तीची केवळ एक रुपया किंमत लावली. तेही त्याने आपल्या वकीलाकडून घेतली. जय हो', असं ट्विट खेर यांनी केलं आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खेर अनेकदा आपली मतं सोशम मीडियावर व्यक्त करत असतात. 

दुसरीकडे प्रकाश राज (Prakash Raj) यांच्याही ट्विटने अनेकांचे लक्ष वेधले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, एक रुपया..सन्मान... कोण काय गमावलं?, असं ट्विट प्रकाश राज यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटसोबत एक फोटाही शेअर केला आहे. फोटोमध्ये प्रशांत भूषण यांचे कार्टून दिसत आहे. यात वकीलाच्या पेहराव्यात असणारा उंच व्यक्ती प्रशांत भूषण यांना खाली वाकून सॉरी वाचण्यास सांगत आहे. पण, भूषण यांनी आपली मान ताठ ठेवली आहे. प्रकाश राज सामाजिक मुद्द्यांवर ट्विटवरुन सक्रिय असतात. त्यांनी याआधीही अनेक ट्विट केली आहेत, ज्यामुळे लोकांचे लक्ष वेधले गेले होते. त्यांचे हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

दोन ट्विट करुन सरन्यायाधीश शरद बोबडे आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना १ रुपयाचा दंड ठोठावला. प्रशांत भूषण यांना १५ सप्टेंबरपर्यंत दंड भरण्याची मुदत देण्यात आली असून दंड न भरल्यास त्यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि त्यांच्या 3 वर्षे वकीली करण्यावर बंदी येऊ शकते.  63 वर्षीय प्रशांत भूषण यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागण्यास नकार दिला होता. माझी वक्तव्ये ही सद्भावनापूर्ण होती आणि जर मी माफी मागितली, तर माझा स्वाभिमान आणि ज्या व्यवस्थेवर सर्वाधिक विश्वास आहे, त्या व्यवस्थेचा अपमान होईल, असे भूषण म्हणाले होते. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेकजण सोशल मीडियातून व्यक्त होताना दिसत आहेत. अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन केले आहे. तर दुसरीकडे अनेकजण प्रशांत भूषण यांच्या समर्थनात पुढे येताना दिसत आहेत. प्रशांत भूषण एक रुपयांचा दंड भरतात की दुसरी शिक्षा भोगतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anupam kher and prakash raj tweet after sc decision on prashant bhushan