काँग्रेसला तामिळनाडुमध्ये धक्का; अप्सरा पुन्हा अण्णाद्रमुकमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

दक्षिण भारतातील मोठं राज्य असलेल्या तामिळनाडुमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

चेन्नई - दक्षिण भारतातील मोठं राज्य असलेल्या तामिळनाडुमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या महासचिवपदी नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर अप्सरा रेड्डी यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून त्यांनी पुन्हा एकदा अण्णा द्रमुकमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवण्यात येईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

अप्सरा यांनी अण्णा द्रमुकमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा करताना ट्विटरवर म्हटलं की, पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अण्णा द्रमुकमध्ये प्रवेश केला आहे. आता अम्मा यांचे सरकार तामिळनाडुमध्ये तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी तयार आहे. 

अण्णा द्रमुकच्या दिवंगत नेत्या आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी अप्सरा यांना राजकारणात आणलं. त्यानंतर अप्सरा या शशिकला दिनाकरन यांच्याशी जोडल्या गेल्या. मात्र काही दिवसांनी त्या पुन्हा OPS-EPS गटात दाखल झाल्या. अप्सरा रेड्डी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकी आधी काँग्रेस प्रवेश केला होता. पक्षाने त्यांच्यावर महिला काँग्रेसच्या महासचिवपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र अप्सरा यांनी आता पुन्हा एकदा अण्णा द्रमुकची वाट धरली आहे.

हे वाचा - चुलत भाऊ-बहिणीचा विवाह बेकायदा; उच्च न्यायालयाने दिला निर्णय

अप्सरा यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं असून मोनाश युनिव्हर्सिटीमध्ये पत्रकारितेची पदवी घेतली आहे. याशिवाय ब्रॉडकास्टिंग पत्रकारितेमध्ये सिटी युनिव्हर्सिटी, लंडनची पदवी घेतली आहे. रेड्डी या बराच काळ पत्रकारितेत होत्या. त्यांना अनेक नामांकित संस्थांमध्ये काम केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: apsara reddy resign congress membership and re join aiadmk