पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार; जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरू असून, या गोळीबारात गोरखा रेजिमेंटचे जवान राजीब थापा हुतात्मा झाला आहे.

श्रीनगर: पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरू असून, या गोळीबारात गोरखा रेजिमेंटचे जवान राजीब थापा हुतात्मा झाला आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (शुक्रवार) दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून पहाटेपासूनच गोळीबार सुरू होता. भारतीय लष्करही चोख प्रत्युत्तर देत होते. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असताना नौशेरा सेक्टरमधील कालसिया गावामध्ये तैनात असलेले जवान राजीब थापा हे जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना तत्काळ लष्करी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. पाकिस्तानकडून गेल्या चार दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.

दरम्यान, नौशेरा सेक्‍टरमधील कलाल परिसरात सोमवारी (ता. 19) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पाकिस्तानने गोळीबार करत तोफगोळ्यांचाही मारा केला होता. भारतीय लष्करानेही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. या चकमकीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी शनिवारी पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारामध्ये भारताचे लान्सनाईक संदीप थापा हे हुतात्मा झाले होते. यानंतर भारतानेही पाकला सडेतोड उत्तर देत त्यांच्या काही चौक्‍या नष्ट केल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Army jawan killed in Pakistan firing along LoC