
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरचे विभाजन आणि या राज्याला वेगळा दर्जा देणाऱ्या ३७० वे कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली असून जुलैमध्ये त्याबाबत सुनावणी होईल. सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, ‘‘ आम्ही या याचिकांवर जुलैमध्ये सुनावणी घेऊ.’’ यावेळी युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ पी. चिदंबरम आणि आणि शेखर नाफाडे यांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. हा मुद्दा ३७० व्या कलमाशी संबंधित असून सध्या मतदारसंघांची देखील फेररचना सुरू असल्याचे नाफाडे यांनी सांगितले.
‘‘ उन्हाळ्याच्या सुट्यानंतर निर्णय घेतला जाईल याबाबत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणे गरजेचे आहे.सध्या न्यायाधीश आणि खंडपीठांच्या स्थापनेच्या अनुषंगाने काही मुद्दे मार्गी लागायचे आहेत.’’ असे सरन्यायाधीशांनी सांगितले.