esakal | सोली सोराबजी : मानवाधिकारांचा पुरस्कर्ता

बोलून बातमी शोधा

Soli Sorabjee
सोली सोराबजी : मानवाधिकारांचा पुरस्कर्ता
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोली सोराबजी हे देशातील सर्वोत्तम घटनातज्ज्ञांपैकी एक होते. त्यांनी न्याय, कायदा, माध्यमांवरील निर्बंध आणि आणीबाणी या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. मानवाधिकार आणि मूलभूत हक्क भंगाच्या घटनांविरोधात त्यांनी कायद्याच्या माध्यमातून कायम आक्रमक लढा दिला. या दोन्ही मूल्यांच्या जपणूकीसाठी ते अखेरपर्यंत जागरुक होते.

२०१५ मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य भंगाच्यासंबंधीच्या श्रेया सिंघल प्रकरणात बाजू मांडत माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील तरतूद रद्द करण्यास भाग पाडले. सोराबजी यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीही जनहित याचिका दाखल केली नव्हती. मात्र, २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे दुखावलेल्या सोराबजी यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण आणि शस्त्र देण्याची शासनाला सूचना करण्याची विनंती केली होती.

सोली सोराबजी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे चांगले संबंध होते. १९९९ मध्ये कारगिल युद्धानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताविरोधात खटला दाखल करत, त्यांच्या नौदलाचे विमान पाडल्याप्रकरणी भारताकडून नुकसानभरपाई मागितली होती. मात्र, ही बाब आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अखत्यारित येतच नाही, असा युक्तीवाद सोराबजी यांनी भारत सरकारच्या वतीने केला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सोराबजी यांची बाजू उचलून धरली होती.

हेही वाचा: अमेरिकेची पहिली खेप भारतात दाखल; काय केलीय मदत?

महत्त्वाचे खटले

  • सोराबजी यांचा शीखविरोधी दंगलीमध्ये पीडित नागरिकांच्या बाजूने लढणाऱ्या सिटीझन्स जस्टीस कमिटीच्या बाजूने न्यायालयीन लढा

  • राज्यघटनेच्या मूलभूत साच्याविषयीचा केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार खटला.

  • राज्यांमधील राष्ट्रपती राजवटीबाबतचा एस. आर. बोम्मई खटला.

  • १९९७ मध्ये संयुक्त राष्ट्रांकडून नायजेरीयामध्ये मानवाधिकारांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी नियुक्ती

  • २००० ते २००६ या कालावधीत हेग येथील लवादाचे सदस्य.

लोकशाही मूल्यांचे पुरस्कर्ते

नवी दिल्ली - माजी ॲटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्या निधनाबद्दल देशातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही सोराबजी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. सोराबजी हे लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे आणि माध्यम स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते, अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी दिली आहे.

सरन्यायाधीश रमणा म्हणाले की, सोराबजी हे ज्या पद्धतीने न्यायालयात बाजू मांडत होते, पुरावे सादर करत होते आणि स्वत:ची स्वतंत्र भूमिका मांडत होते, त्यातून लोकशाही मूल्यांसाठी त्यांची असलेली कळकळ सातत्याने दिसून आली. राज्यघटनेच्या काटेकोर पालनासाठी ते स्वत: आयुष्यभर आग्रही राहिले, शिवाय इतरांनाही त्यांनी तसे वागण्याबाबत जाणीव करून दिली.

सोली सोराबजी यांच्या निधनाने भारतातील कायदा व्यवस्थेतील एक आदर्श गमावला आहे.

- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

राज्यघटनेच्या गाभ्याशी असलेल्या कटिबद्धतेचे एक उदाहरण म्हणून सोली सोराबजी यांच्याकडे पाहता येईल.

- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते