esakal | अमेरिकेची पहिली खेप भारतात दाखल; काय केलीय मदत?

बोलून बातमी शोधा

narendra modi and joe biden
अमेरिकेची पहिली खेप भारतात दाखल; काय केलीय मदत?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- देशात कोरोनाची स्थिती बिकट होत असून भारतात दररोज तीन ते साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. रुग्णालयात बेड शिल्लक नसून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी ऑक्सिजनही मिळत नसल्याचे चित्र आहे. भारतातील बिघडणारी स्थिती पाहता परदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. याप्रमाणे अमेरिकेतून वैद्यकीय उपकरण आणि औषधांची पहिली खेप आज भारतात दाखल झाली.

आज सकाळी २८० ऑक्सिजन कॉन्सट्रेटरबरोबरच वैद्यकीय उपकरणाची पहिली खेप नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अमेरिकेचे आभार मानले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चारशेहून अधिक ऑक्सिजन सिलिंडरसह सुमारे एक दशलक्ष रॅपिड टेस्ट किट आणि अन्य रुग्णालयातील उपकरणे घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान दाखल झाले. अमेरिकेच्या दूतावासाने ट्विट करत वैद्यकीय उपकरण आणि साहित्याचे छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यात म्हटले की, कोविडच्या संकट काळात अमेरिकेहून भारतात पहिली मदत दाखल झाली आहे.

हेही वाचा: डोवाल यांच्या कॉलनंतर अमेरिका भारताच्या मदतीला तयार

गेल्या सात दशकांपेक्षा अधिक काळापासून उभय देशांत संबंध असून अमेरिका आज भारतासमवेत उभा आहे. आम्ही एकत्रितरीत्या कोविडचा सामना करत आहोत, असे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका हवाई दलाचे विमान सी-१७ ग्लोबमास्टर-३ हे भारतासाठी वैद्यकीय साहित्य घेऊन भारतात दाखल झाले. व्हाइट हाऊसने म्हटले की, येत्या काही दिवसात अमेरिका भारताला ११०० ऑक्सिजन सिलिंडर, १७०० कॉन्सट्रेटर, ऑक्सिजन तयार करणारे युनिट, दीड कोटी एन-९५ मास्क, कोव्हिशिल्ड लशीसाठी कच्चा माल आणि २० हजार रेमडिसिव्हिर इंजेक्शन पाठवणार आहे.

हेही वाचा: पाकिस्तान ते अमेरिका; कोरोना संकटात अनेक देश भारताच्या मदतीला

रुमानिया, आयर्लंडची मदत

अमेरिकेबरोबरच अन्य देशही भारताला मदत करत आहेत. रुमानियाकडून ८० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि ७५ ऑक्सिजन सिलिंडर भारतासाठी पाठवण्यात आले आहे. जपानने देखील कोविड संकटकाळात भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. आयर्लंड देखील भारताला मदत पाठवली आहे. आयर्लंडकडून भारताला ७०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि ३६५ व्हेंटिलेटर आज मिळाले.