भाजप नेते अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर

सकाळ न्यूज नेटवर्क 
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

भाजपच्या यावर्षी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या नंतर जेटली यांचे सार्वजनिक दर्शन झालेले नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी प्रकृती अस्वसास्थ्यामुळे 'मोदी-2' मंत्रिमंडळात सामील होण्यास नकार दिला होता.

नवी दिल्ली : 'एम्स'मध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री तसेच संरक्षणमंत्री अरूण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी आज एम्स गाठले. डॉक्टरांनी सायंकाळी दिलेल्या निवेदनात जेटली यांचे रक्ताभिसरण योग्य रितीने सुरू असल्याचे म्हटले आहे. 

जेटली यांना काल दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. श्‍वासोच्छ्वासास त्रास होऊ लागल्याने त्यांना अतिदक्षता विभागामध्ये भरती करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी 'एम्स'मध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जेटली हे उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे उपराष्ट्रपती कार्यालयानेही स्पष्ट केले.

दरम्यान, जेटली यांची प्रकृती 'हिमोडायनेमिकली स्टेबल' असल्याचे एम्सने म्हटले आहे. 'हिमोडायनेमिकली स्टेबल' म्हणजे रुग्णाचे ह्रदय काम करत असून रक्ताभिसरण होत असल्याचे एम्सने म्हटले आहे. 

जेटली यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरही ते सतत प्रकती अस्वास्थ्याने त्रस्तच राहिले आहेत.  मागील वर्षाच्या उत्तरार्धापासून त्यांची प्रकृती अधिकच ढासळली. मूत्रपिंडाचा विकार, मधूमेह याबरोबरच त्यांना गतवर्षी 'सॉप्ट टिश्‍यू' प्रकारचा कर्करोग झाल्याचेही निदान झाले. त्यावर त्यांनी यावर्षी जानेवारीत अमेरिकेत जाऊन उपचार घेतले व ते परतले. नंतर त्यांनी बराच काळ घरूनच मंत्रालयाचा कारभार चालविला.

भाजपच्या यावर्षी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या नंतर जेटली यांचे सार्वजनिक दर्शन झालेले नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी प्रकृती अस्वसास्थ्यामुळे 'मोदी-2' मंत्रिमंडळात सामील होण्यास नकार दिला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arun Jaitley is now stable