अरुण जेटली यांना सर्वपक्षीय नेत्यांची आदरांजली

Arun-Jaitley
Arun-Jaitley

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे, एक चांगला मित्र आणि संसदपटू गमावल्याची प्रतिक्रिया केवळ भाजपच नव्हे, तर सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली आहे.

ज्या काळात भाजप सत्तेपासून अनेक कोस दूर होता, अशा काळात झालेल्या नेत्यांपैकी जेटली हे एक होते. साहजिकच सर्व पक्षाच्या नेत्यांशी समन्वयाचे संबंध ठेवणे, मित्रत्वाच्या भावनेने वागणे, याच सूत्रानुसार त्यांनी राजकारण केले. विरोधी पक्षात असताना सर्वाधिक काळ राजकारणात घालवल्यामुळे सत्ता पक्षात येणारा अहंकार हा जेटलींच्या पिढीतील नेत्यांमध्ये दिसत नसे.

त्यामुळेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, शरद पवार, मायावती, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, जयललिता, लालूप्रसाद आणि मुलायम सिंग यादव यांच्यापर्यंत विविध पक्षातील नेत्यांबरोबर एवढेच नव्हे, तर राजकारणाच्या पलीकडे क्रिकेट आणि दिल्ली तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या वर्तुळातही जोडलेले अनेक मित्र होते. त्यामुळेच भारताच्या सरन्यायाधीशांपासून अनेक वकिलांनी आणि न्यायाधीशांनी निधनाबद्दल आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.  

राष्ट्रपती रामनाथ कोविंद : अरुण जेटली यांच्या निधनाने देशाने एक निष्णात कायदेतज्ज्ञ, उत्कृष्ट संसदपटू आणि शिक्षणमंत्री गमावला आहे. त्यांचे निधन ही देशासाठी अभूतपूर्व हानी आहे. जेटली यांनी राजकारणातील प्रत्येक जबाबदारीतून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात मोलाचा वाटा उचलला.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू : दीर्घकालीन मित्र असलेले अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मी सुन्न झालो आहे. एका निष्णात राजकीय नेत्याचे अकाली निधन होणे, हे नुकसान न भरून येण्यासारखी आहे माझ्यासाठी तर ही व्यक्तिगत हानी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी : माझा दीर्घ काळचा मित्र आज मी गमावला आहे. भाजप आणि जेटली हे एक अतूट समीकरण आहे आणि राहिलही. राजकीय क्षेत्रात जेटली यांची उंची होतीच, पण बौद्धिक आणि कायदेशीर दृष्ट्या जेटली हे देशाचा मौल्यवान ठेवा होते. त्यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्यास सुरुवात केल्यापासून पक्ष अनेक वर्षे वृद्धिंगत होत गेला. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग : समाजाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असे नेतृत्व जेटली यांच्या निधनाने हरपले आहे. ते उत्कृष्ट संसदपटू होते, तेवढेच निष्णात कायदेतज्ज्ञ असताना आणि आता सत्तेत असताना देखील जेटली यांनी माझ्याशी व्यक्तिगत स्नेहाचे संबंध ठेवले.

भाजप अध्यक्ष अमित शहा : जेटली यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान तर झाले आहेच, पण त्यांचे निधन हे माझ्यासाठी व्यक्तिगत नुकसान आहे. अनेक वेळा अनेक विषयांवर त्यांचा सल्ला हा मला वेळोवेळी मार्गदर्शक ठरत आलेला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग : जेटली यांच्याशी गेली अनेक वर्षे माझी घनिष्ठ मैत्री होती.  भाजपच्या वाटचालीत ज्यावेळी अडचणीचे प्रसंग आले, तेव्हा जेटलींनी दिलेला सल्ला बहुमोलाचा ठरला आहे.

रस्ते व महामार्ग मंत्री नितिन गडकरी : जेटली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. देशातील पहिल्या दोन तीन नामवंत वकीलांमध्ये त्यांचा समावेश होता. भाजपचा विस्तार आणि आलेख या दोन्हीच्या प्रभावी कामगिरीमध्ये जेटली यांचे योगदान कायम स्मरणात राहील. तसेच त्यांनी संसदेत केलेली भाषणे सदैव लक्षात राहतील.

बसपा नेत्या मायावती : जेटली हे राजकीय नेते म्हणून प्रभावी होते. तसेच एक व्यक्ती म्हणूनही अतिशय चांगले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदे मंत्री आणि मोदी मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशाला दिलेले योगदान विसरता येणार नाही. राज्यसभेत तप्त वातावरण असले तरी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधून त्या अडचणींतून जेटली अनेकदा मार्ग काढत. 

माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर : जेटली हे उत्तम वक्ते आणि संसदपटू होते. कायदेशीर बाबींमध्ये मार्ग काढण्यात त्यांचा हात धरणारा दुसरा कोणी नाही. भाजपसाठी त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे. अटलजी, मनोहर पर्रिकर, अनंत कुमार, सुषमा स्वराज आणि आता जेटली या मोठ्या नेत्यांचे एकामागून एक जाणे, हे माझ्यासाठी देखील व्यक्तिगत फार मोठे नुकसान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com