esakal | अरुण जेटली अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

अरुण जेटली अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ अरुण जेटली यांच्यावर दिल्लीतील निगम बोध घाट येथे आज (रविवारी) दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

अरुण जेटली अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ अरुण जेटली यांच्यावर दिल्लीतील निगम बोध घाट येथे आज (रविवारी) दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

संसदेपासून सडकेपर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्‍य अरुण जेटली यांचे शनिवारी दुपारी पाऊणच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी संगीता तसेच त्यांचा वकिलीचा वारसा चालविणारी रोहन व सोनाली ही मुले आहेत. 'एम्स'मधून त्यांचे पार्थिव कैलास कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले.


आज सकाळी 10 पर्यंत पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात नेण्यात आले. याठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. तेथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अखेर अडीचच्या सुमारास निगम बोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मधुमेहापासून कर्करोगापर्यंत अनेक आजारांशी झुंज देणारे जेटली यांनी गेली पाच वर्षे मोदी सरकारचे "संकटमोचक' ही भूमिका निभावली होती. मात्र, आजारपणामुळे त्यांच्या फिरण्यावर दिवसेंदिवस मर्यादा येत गेल्याने यावर्षी लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी प्रकृती अस्वस्थामुळे मंत्रिमंडळात येऊ शकणार नाही, असे जाहीर केले. सुषमा स्वराज यांच्या आकस्मिक निधनानंतर दोनच दिवसांनंतर जेटली यांना अतिशय गंभीर अवस्थेत 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने बिघडतच गेली. गेल्या आठवड्यात त्यांना व्हेंटिलेटरवरून जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. अखेर आज दुपारी पाऊणच्या सुमारास त्यांचे निधन झाले, असे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. संसदेतील "विद्युल्लता' असे वर्णन होणाऱ्या माजी विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या अकाली निधनाच्या धक्‍क्‍यातून सावरत असलेल्या सत्तारूढ भाजपला स्वराज यांच्याच वयाचे जेटली यांच्या जाण्याने अवघ्या पंधरवडाभरात दुसरा मोठा धक्का बसला आहे. 

नवी दिल्लीमध्ये 28 डिसेंबर 1952 रोजी जन्मलेले जेटली यांनी दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते म्हणून सार्वजनिक कारकीर्द सुरू केली. आणीबाणीच्या काळात त्यांना 19 महिन्यांचा कारावास झाला. तिहार कारागृहामधील "त्या' दिवसांवर त्यांनी लिहिलेल्या आठवणींचे पुस्तकही चांगलेच गाजले. भाजपमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी 1991 पासून सक्रिय राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळात ते कायदामंत्री होते. मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मुख्यत्वे अर्थ व संरक्षण अशी अतिशय महत्त्वाची मंत्रिपदे समर्थपणे सांभाळली. 

गेली किमान तीन वर्षे एकामागून एक आजारपणांशी झुंज देणारे जेटली यांना गेल्या आठवड्यात "एम्स'मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी "एम्स' गाठले व जेटली यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्‍टरांशी चर्चा केली तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही "एम्स'मध्ये जाऊन जेटली यांची विचारपूस केली. जेटली यांना "एम्स'मध्ये दाखल केल्यानंतर त्या दिवशी डॉक्‍टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबतचे निवेदन जारी करून त्यांची तब्येत "हेमो-डायनॅमिकली' स्थिर असल्याचे म्हणजे जेटलींचा रक्तदाब स्थिर असून, त्यांची नाडी चालू असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर "एम्स'कडून याबाबत एकही निवेदन आलेले नव्हते. 

जेटली यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहे. त्यांच्या फुफ्फुसात पाणी शिरल्याने त्यांना श्‍वासोच्छास करण्यास त्रास होत होता व त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक बनली होती. ही समस्या वारंवार उद्भवत होती. आज सकाळीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी "एम्स'मध्ये भेट दिली व त्यानंतर पुन्हा त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू झाली. जेटली यांना पूर्वीपासूनच मधुमेहाचा विकार होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी स्थूलतेवर उपचार म्हणून "बॅरिएट्रिक' शस्त्रक्रिया केली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची गुंतागुंत वाढली. यंदा जानेवारीत त्यांना "सॉफ्ट टिशू सरकोमा' नावाचा कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत जाऊनही उपचार घेतले होते.

loading image
go to top