Donyi Polo Airport : अरुणाचलचे विकासाकडे पाऊल; नरेंद्र मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arunachal Pradesh Donyi Polo airport Inauguration

Donyi Polo Airport : अरुणाचलचे विकासाकडे पाऊल; नरेंद्र मोदी

इटानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अरुणाचल प्रदेशची राजधानी इटनगर येथील ‘दोन्यी पोलो’ या विमानतळाचे उद्‌घाटन करण्यात आले. हा या राज्यातील पहिला ग्रीनफिल्ड विमानतळ आहे.

दोन्यी पोलो विमानतळ इटानगरपासून १५ किलोमीटर अंतरावरील हिलाँगी येथे बांधण्यात आला आहे. या विमानतळामुळे अरुणाचल प्रदेशचे उर्वरित देशाशी असलेले संपर्काचे जाळे अधिक मजबूत होणार आहे. या विमानतळावरून व्यावसायिक विमान उड्डाणांबरोबरच राज्यातील इतर भागांपर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरसेवाही सुरु केली जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच फेब्रुवारी २०१९ मध्ये या विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले होते. आज त्यांच्याच हस्ते या विमानतळाचे उद्‌घाटन करण्यात आले. हा विमानतळ एका नव्या अविकसीत जागेवर, पूर्णपणे नव्याने उभारण्यात आला असल्याने त्याला ग्रीनफिल्ड विमानतळ म्हटले जात आहे.

यावेळी मोदी म्हणाले,‘‘अरुणाचलमधील नव्या प्रकल्पांमुळे येथे विकासाची नवी पहाट उगवेल. तीन वर्षांपूर्वी या विमानतळाचे भूमिपूजन करताना आमच्या टीकाकारांनी, निवडणुक जिंकण्यासाठीची ही खेळी आहे, असा आरोप केला होता. मात्र, सध्या राज्यात कोणत्याच निवडणुका नसतानाही आम्ही या विमानतळाचे उद्‌घाटन करत आहोत. या विमानतळामुळे राज्याला पर्यटन आणि व्यापारामध्ये मोठा फायदा होणार आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी मी वर्षाचे सर्व दिवस काम करतो. निवडणुक जिंकण्यासाठी आम्ही काम करत नाही. मी आता सकाळी अरुणाचल प्रदेशमध्ये आणि संध्याकाळी देशाच्या दुसऱ्या टोकाला, गुजरातला असणार आहे. दरम्यान मी वाराणसीतही थांबणार आहे.’’ दोन्यी पोलो हा अरुणाचल प्रदेशमधील चौथा विमानतळ आहे.

पंतप्रधान मोदींनी आज ६०० मेगावॉट क्षमतेच्या कामेंग जलविद्युत प्रकल्पाचेही लोकार्पण केले. ८० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी एकूण ८,४५० कोटी रुपये खर्च आला आहे. या प्रकल्पामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये मागणीपेक्षा अधिक वीजनिर्मिती होऊन त्यामुळे राष्ट्रीय ग्रीडला फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

संस्कृतीशी नाते

दोन्यी (सूर्य) आणि पोलो (चंद्र) हे शब्द अरुणाचल प्रदेशमधील प्राचीन आदिवासी संस्कृतीशी नाते जोडणारे आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या विमानतळासाठी हे नाव निश्‍चित केल्यानंतर राज्यातील आदिवासी समुदायाने आनंद व्यक्त केला.

विमानतळाची वैशिष्ट्ये

  • क्षेत्रफळ - ६९० एकर

  • खर्च - १,६४० कोटी रु.

  • धावपट्टीची लांबी - २३०० मीटर