esakal | अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारला क्लिन चिट
sakal

बोलून बातमी शोधा

Manish Sisodia

अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारला क्लिन चिट

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - दिल्ली परिवहन महामंडळातील एक हजार बस खरेदी कथित गैरव्यवहारप्रकरणी नायब राज्यपाल अनिल बैजल (Anil Baijal) यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या (AAP Party) सरकारला क्लिन चीट (Clean Chit) दिली आहे. या प्रकरणी भाजपने आरोप केल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. (Arvidn Kejriwal Delhi Government Clean Chit)

भारतीय जनता पक्षाचे आमदार विजेंद्र गुप्ता यांनी एक हजार बस खरेदी आणि देखभाल कंत्राट यात केजरीवाल सरकारने गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बैजल यांनी तीन सदस्यीय समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. त्यात गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल समितीने दिल्यानंतर बैजल यांनी दिल्ली सरकारला क्लिन चिट दिली.

हेही वाचा: 'कोव्हॅक्सिन'चा आपत्कालीन वापराच्या यादीत लवकरच समावेश

गुप्ता यांनी केजरीवाल सरकारने साडेतीन हजार कोटी रुपये वाया घालविल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात आर्थिक अनियमितता आढळली नाही, तर नायब राज्यपालांनी नव्याने निविदा प्रक्रिया करण्याचा आदेश का दिला आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून, या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुरवातीपासून हे प्रकरण भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे देण्याची मागणी होती, असेही त्यांनी म्हटले आहे. केजरीवाल सरकारला नायब राज्यपालांनी क्लिन चीट दिल्यानंतर आम आदमी पक्षाने समाधान व्यक्त केले. भाजपच्या खोट्या आरोपाचा पर्दाफाश झाला असून, ही क्लिन चीट म्हणजे केजरीवाल सरकारच्या प्रामाणिकपणाचा पुरावा आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

बस खरेदी प्रकरणी चौकशी समिती स्थापन झाली. या समितीने तीन हजार पानांचे दस्तावेज तपासले. परंतु त्यांना कुठेही अनियमितता सापडली नाही. केजरीवाल सरकार प्रामाणिक असून, भाजपचे नेते सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहेत. परंतु आरोप करून त्यांना त्यात यश आले नाही. लोकांसाठी दिल्ली सरकार दिवसरात्र काम करीत आहेत. यातून शिकण्यापेक्षा भाजप खोटे आणि तिरस्कार पसरविण्याचा प्रयत्न करत आहे.

- मनीष सिसोदिया, उपमुख्यमंत्री, दिल्ली

loading image