
सिसोदियांच्या आठवणीने केजरीवाल भावुक; चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकल्याचा दावा
नवी दिल्ली : ‘‘सिसोदिया यांनी विशेष कौशल्य अभ्यास केंद्राच्या माध्यमातून दिल्लीमध्ये चांगल्या शाळांची निर्मिती केल्याने त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली आणि म्हणूनच त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले’’ असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केला.
दिल्लीतील बावना येथील शाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिसोदिया यांच्या आठवणीने केजरीवाल भावुक झाले. बावना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष कौशल्य अभ्यास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केजरीवाल म्हणाले की, ‘‘आज या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी मला मनीष सिसोदिया यांची आठवण होत आहे.
दिल्लीतील सर्व मुलांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी हा उपक्रम त्यांनीच सुरु केला होता. आज मात्र त्यांच्यावर खोटे आरोप करून अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांना तुरुंगात टाकले आहे.’’ सत्याचा नक्कीच विजय होईल, सिसोदिया यांना लवकरच जामीन मिळेल, असा विश्वासही केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी केजरीवाल यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली. ‘‘भाजपला दिल्लीचा विकास रोखायचा आहे, दिल्लीच्या शिक्षण क्षेत्रात झालेले क्रांतिकारी बदल त्यांना रोखायचे आहेत. परंतु आम्ही त्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही,’’ असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीतील सरकारी शाळा उत्कृष्ट असल्याचे संपूर्ण जग मान्य करत आहे, असा दावाही केजरीवाल यांनी यावेळी केला.
सुरक्षित वातावरण हवे, राजकारण नव्हे: केजरीवाल
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. ते म्हणाले की, ‘‘दिल्लीत गुन्हेगारांना भीती उरलेली नाही, जनतेचा पोलिसांवरचा विश्वास उडत आहे, अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांनी राजकारण न करता, ज्या घटनात्मक पदाची जबाबदारी तुमच्यावर आहे ती कर्तव्ये पार पाडावीत. नागरिकांना सुरक्षित वातावरण हवे आहे, राजकारण नाही’’