'भाजपची लाट वगैरे काही नाही; तेलंगणा भाजपला जरुर रोखेल'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

या निवडणुकीत अवघ्या चार जागांवरुन भाजपाने 48 जागांवर विजय मिळवला आहे. 

हैद्राबाद : हैद्राबादमधील महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM पक्षासाठी धक्कादायक लागले आहेत. कारण या निवडणुकीत भाजप पक्षाने MIM पक्षाला मागे खेचत सरशी घेतली आहे. अवघ्या चार जागांवरुन भाजपाने 48 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कुणाही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाहीये. याविषयी बोलताना पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, कुठे आहे भाजपची लाट? लाट असती तर भाजपा महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत हारली नसती. आम्ही लोकशाही मार्गाने लढत आहोत. आम्ही 51 जागा लढवल्या आणि त्यातील 44 जागा जिंकल्या. विचार करा जर आण्ही 80 जागा लढवल्या असत्या तर काय झालं असतं?

2016 मध्ये पक्षाने 60 जागा लढवल्या आणि 44 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यावर्षीचा स्ट्राईक रेट हा नक्कीच गेल्यावेळच्या निवडणुकीहून जास्त आहे, असं त्यांनी म्हटलं. मला विश्वास आहे की तेलंगणातील लोक भाजपला वाढण्यापासून वेळीच रोखतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागा निवडून आल्यानंतर वाढलेल्या आत्मविश्वासामुळे ओवैसींच्या पक्षाला या वर्षीच्या हैद्राबाद निवडणुकीत जास्त जागा मिळवण्याची आशा होती. मात्र, पक्षाने 2016 च्या आपल्या 44 जागांचा गड आहे तसाच राखण्यात यश मिळवलं. ओवैसी पुढे म्हणाले की, हैद्राबादच्या GHMC निवडणुकीत आम्ही 44 जागा मिळवल्या आहेत. मी नवनियुक्त सगळ्या नगरसेवकांना सांगितलं आहे की उद्यापासूनच काम सुरु करा. 

हेही वाचा - शेतकरी आंदोलनात जोश-उत्साह-प्रोत्साहनासाठी डीजे ट्रॅक्टर

तेलंगणा राष्ट्र समितीबाबत  बोलताना ओवैसी म्हणाले की, आमच्या विरोधात असणारा टीआरएस हा पक्ष तेलंगणातील एक मजबूत राजकीय पक्ष आहे हे स्वीकारल पाहिजे. ते तेलंगणाच्या प्रादेशिक भावनांचे प्रतिनिधित्व करतात. मला खात्री आहे की के. चंद्रशेखर राव या निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतील आणि ते भाजपासाठी ते एक मोठे आव्हान असेल.

GHMC निवडणूक 150 जागांवर लढवण्यात आली. यामध्ये सत्ताधारी TRS पक्ष हा 55 जागांसह सर्वांत मोठा  पक्षा ठरला आहे. मात्र मागच्या वेळेहून 44 जागा त्यांना गमवाव्या लागल्या आहेत. 2016 च्या निडवणुकीत TRS पक्षाला 99 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाने आपली सगळी ताकद पणाला लावली होती. ही निवडणुक प्रतिष्ठेची बनवत MIM ला काटे की टक्कर द्यायचा भाजपचा प्रयत्न होता. TRS आणि MIM या पक्षांमध्ये छुपी युती असल्याचा आरोपही भाजपाने केला होता. हैद्राबादचे नाव भाग्यनगर करु या योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यावर ओवैसी यांनी टीका करत म्हटलं होतं की, योगी आदित्यनाथांची पिढी संपेल पण हे शहर हैद्राबाद नावानेच ओळखलं जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asaduddin Owaisi Reaction after hyderabad ghmc election results 2020 AIMIM TRS BJP