गेहलोत गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी;विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्याच्या हालचाली 

वृत्तसंस्था
Monday, 20 July 2020

 आपल्या गटाची ताकद सिद्ध करण्यासाठी गेहलोत हे पुढील आठवड्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. गेहलोत यांनी नुकतीच राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली होती. 

नवा दिल्ली - राजस्थानातील राजकीय संघर्षात अखेर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पारडे जड झाले असून त्यांनी आपला बालेकिल्ला आणखी मजबूत करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. आपल्या गटाची ताकद सिद्ध करण्यासाठी गेहलोत हे पुढील आठवड्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. गेहलोत यांनी नुकतीच राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये बरेच काही शिजल्याचे बोलले जाते. सध्या पायलट यांच्या गटाकडे तीस आमदारांचे पाठबळ असून गेहलोत यांच्या गटाने १०९ आमदार आपल्या पाठीशी असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र ऐनवेळी गणित बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

दुसरीकडे गेहलोत यांचे सरकार पाडण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप असलेले केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रियमंत्री अजय माकन यांनी ही मागणी केली आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणी राजस्थान पोलिसांनी काँग्रेसचे आमदार भंवरलाल शर्मा, शेखावत आणि संजय जैन यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. या क्लिपमध्ये आपला आवाज नसल्याचा दावा शेखावत करत असून त्यांनी हा आवाज त्यांचा नसेल तर आवाजांचे नमुने तपासासाठी द्यावेत, यासाठी ते का घाबरत आहेत? असा सवाल माकन यांनी केला. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील सरकार हे कडबोळ्याचे असून त्यांनी कधीच बहुमत गमावले आहे. बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्यास हे सरकार कोसळेल. भाजप सभागृहात अविश्वास प्रस्ताव मांडणार नाही. सध्या आम्ही केवळ घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहोत. पायलट यांना आम्ही पक्षात या म्हणून निमंत्रण देणार नाही पण ते भाजपमध्ये आले तर स्वागतच आहे. 
सतिश पुनिया, प्रदेशाध्यक्ष भाजप 

भाजपने आतापर्यंत बहुमत चाचणी घ्या, अशी मागणी केलेली नाही, विनाकारण आम्हाला या वादात ओढले जात असून योग्य वेळ आल्यानंतर आम्ही पाऊले उचलू. 
गुलाबचंद कटारिया, नेते भाजप 

पोलिसांकडून चौकशी सुरू असून एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे, ऑडिओ क्लिपच्या तपासात अडथळा निर्माण व्हावा म्हणून भाजप सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. 
अभिषेक मनू सिंघवी, नेते काँग्रेस 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एखाद्याने महत्वाकांक्षी असण्यात काही गैर नाही पण या महत्वाकांक्षेबरोबर संघटना, विचारधारा आणि देश यांचाही विचार करावा. जी चूक ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली ती पायलट यांनी करू नये. 
दिग्विजयसिंह, नेते काँग्रेस 

वुहानसारख्या सुविधेच्या माध्यमातून लोकांनी निवडून दिलेले हे सरकार पाडण्यासाठी विषाणू सर्वत्र पसरला आहे. राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टात संशोधन केल्याने बराच बदल होऊ शकतो. 
कपिल सिब्बल, नेते काँग्रेस 

पायलट आणि समर्थक अज्ञातस्थळी 
सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आपला मुक्काम हरियानातील मानेसरमधून अज्ञातस्थळी हालविला असून सध्या ते नेमके कोठे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पायलट हे सध्या ट्विटरवर सक्रिय असल्याचे दिसून येते. त्यांनी शनिवारी ट्विट करून आसाम आणि बिहारमधील पूरग्रस्तांना देशाने मदत करावी असे आवाहन केले होते. याआधी राजस्थान पोलिसांचे एक पथक या आमदारांची चौकशी करण्यासाठी हरियानाला गेले होते पण त्यांनाही रिकाम्या हाताने परतावे लागले होते. काँग्रेसचे उदयपूरवाटी येथील आमदार राजेंद्र गुढा यांनी आज खळबळजनक आरोप केला. संजय जैन यांच्यावतीने काही मध्यस्थांनी आपल्याशी संपर्क साधून पैशाचे आमिष दाखवविल्याचे त्यांनी म्हटले आहे. आठ महिन्यापूर्वी जैन माझ्याकडे देखील आले होते. राजेंना भेटण्यासाठी जैन हे आपल्यावर दबाव आणत होते असा आरोप गुढा यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashok gehlot political struggle in Rajasthan