
नवी दिल्ली : घरची परिस्थिती अत्यंत बेताची...आजारी वडील आणि घरी पैशांची अडचण...त्याने आठवीतूनच शाळा सोडली आणि १५०० रुपयांची नोकरी मिळविली. पण, आज हाच २८ वर्षीय तरुण विदेशात स्वतःची कंपनी चालवतोय. त्यामधून वर्षाला अडीच कोटी रुपयांची उलाढाल करतोय.
आसिफ शेख, असे या तरुणाचे नाव असून तो उद्योजक, डिजिटल मार्केटर, शिक्षक, लेखक आणि परोपकारी व्यक्ती आहे. त्याचा जन्म श्रीनगरमधील बटलूममध्ये झाला असून त्याचठिकाणी तो वाढलाय. आसिफचे वडील काश्मीर खोऱ्यामध्ये कॉन्स्टेबल होते. एकदा ते आजारी पडले. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्यामुळे आसिफला आठवीमधूनच शाळा सोडावी लागली. वयाच्या १६ व्या वर्षी आसिफला स्थानिक पर्यटन केंद्रात डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून पहिली नोकरी मिळाली. तिथे त्याला महिन्याला १५०० रुपये पगार मिळायचा. त्याने पर्यटन कंपन्यांपासून तर मेडिकल स्टोअरपर्यंत मिळेले ते काम केले. त्याने वोडाफोन, एअरटेल यांसारख्या कंपन्यांच्या कार्यालयामध्ये देखील काम केले. सप्टेंबर २०१४ मध्ये त्याने सर्व सोडले आणि स्वतःचं काहीतरी करायचं ठरवलं. मात्र, काश्मीर खोऱ्यांमध्ये पूर आला आणि सर्व काही होत्याचं नव्हतं झालं.
पुन्हा शून्यातून सुरुवात -
२०१४ च्या पुरानंतर आसिफचं जीवन पूर्णपणे बदललं होतं. त्याने पुन्हा नव्याने सुरुवात केली. ''माझ्या आजूबाजूची परिस्थिती अत्यंत बिकट होती. तरीही मला नेहमी संधी मिळाल्या. अशीच २०१५ मध्ये दिल्लीत एक संधी मिळाली. दिल्लीला आल्यानंतर मला माझे स्वप्न पूर्ण करता येणार होते. पुरात उद्ध्वस्त झालेले घर उभारण्यासाठी जवळ असलेले सर्वच पैसे खर्च केले. मात्र, त्याने उद्योजक बनण्याचं स्वप्न सोडलं नाही. २०१६ मध्ये तो काम करत असलेल्या एका प्रोजेक्टचा भाग म्हणून त्याला इंग्लंडला जायची संधी मिळाली. त्याठिकाणी त्याला वेबसाईट डिझाइनचं पहिलं काम मिळालं. मात्र, वेबासाईट आवडल्यानंतरच त्याचे पैसे मिळणार होते. त्यामुळे आसिफने त्यासाठी कठोर परीश्रम घेतले. त्यानंतर त्याला दुसरं काम देण्यात आलं. तो गॅरेजमधील ग्राहकांसाठी लोगो आणि वेबसाईटचे काम करू लागला. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याला ७ लाख रुपये मिळाले. त्यामुळे विदेशात स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आसिफला पाठबळ मिळाले होते.
...अन् उभारली स्वतःची कंपनी -
2018 मध्ये, यूके आणि काश्मीरमधील दोन कार्यालयांमधून सुमारे 35 लोकांच्या कार्यशक्तीसह आसिफने थेम्स इन्फोटेकची स्थापना केली. मला या पदावर येण्यासाठी 10 वर्षे आणि जवळजवळ आठ वेगवेगळ्या नोकऱ्या कराव्या लागल्या, असे आसिफने 'The Better India' सोबत बोलताना सांगितले.
खोऱ्याला देशासोबत जोडण्याचा प्रयत्न -
भारतात 4G नेटवर्क सुरू असताना खोऱ्यातील लोकांसाठी ते दिवास्वप्नच होतं. २०१६ पर्यंत खोऱ्यामध्ये 2G नेटवर्क होतं. ते देखील कधीही डिस्कनेक्ट व्हायचं. त्यावेळी त्यांना इंटरनेटसाठी पैसे मोजावे लागत होते. मात्र, २०१६ मध्ये चांगली कनेक्टीव्हीटी मिळाली. त्यामुळे आसिफने खोऱ्यातील विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केंटींग, वेबसाईट डिझाईंग, ग्राफिक्स याचे मोफत ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली. आपल्या मुलाने डॉक्टर बनावे, असे प्रत्येक पालकाचे स्वप्न आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत हे कोणालाही माहिती नाही. मात्र, मला त्यांचा दृष्टीकोण बदलायचा आहे, असेही आसिफ सांगतो.
झीनत उल निसा ही आसिफची एक विद्यार्थिनी आहे. ती आयटीची विद्यार्थिनी आहे. मात्र, कुठलाही कोर्स करण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. तिला आसिफने शिक्षण दिले. तिने आसिफकडून तीन महिन्याचा डिजिटल मार्केटींगचा कोर्स पूर्ण केला. सोशल मीडियाची चांगली समज आल्याने मला आता एक चांगली फूड ब्लॉगर बनता आले. आसिफ खरोखरंच आमचा मार्गदर्शक असून आमच्यासाठी त्याने खूप काम केले, असेही ती सांगते.