सर्वपक्षीय बड्या नेत्यांचा प्रचार आसामच्या चहाच्या मळ्यांत

Assam
Assam

गुवाहाटी - आसाममधील सर्वाधिक महत्त्वाचा मतदार असलेल्या चहाच्या मळ्यांमध्ये राबणाऱ्या कामगारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करताना दिसून येतात. भाजप आणि काँग्रेसप्रमाणेच आसाम गण परिषद आणि नव्यानेच स्थापन झालेल्या आसाम जतिया परिषद या पक्षांनी कामगारांमध्ये प्रचार करण्यावर भर दिला आहे. अप्पर आसाममधील आठ मतदारसंघांमध्ये या कामगारांचे प्राबल्य आहे. 

राज्यामध्ये २७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यात ४७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे, यातील ३८ मतदारसंघांचा समावेश हा चहा उत्पादक जिल्ह्यांमध्ये होतो. त्यात जोरहाट, गोलाघाट, सिबासागर, दिब्रुगड, तिनसुखिया, विश्‍वनाथ आणि सोनीतपूर यांचा समावेश आहे. राज्यातील ८५० मळ्यांमध्ये तब्बल आठ लाख कामगार राबतात. त्यामुळे या समुहाचे एकगठ्ठा मतदान सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचे असते. आतापर्यंत या कामगारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मळ्यांत भगवी लाट
याआधी २०१४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हाच कामगार भाजपच्या पाठीशी उभा राहिला होता. यामुळे भाजपला चहापट्ट्यातील सातपैकी चार मतदारसंघांमध्ये मुसंडी मारता आली होती. त्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २२ जागा जिंकल्या होत्या आसाम गण परिषदेला चार जागा मिळाल्या होत्या. यानंतर २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने लोकसभेच्या नऊ मतदारसंघांमध्ये झेंडा रोवला होता. यामुळे चहाच्या मळ्यांमध्ये भगवी लाट उसळली होती.

आश्‍वासनांची खैरात
भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यामध्ये जाणीवपूर्वक या घटकांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. यामुळेच काँग्रेसने रोजची मजुरी १६७ रुपयांवरून ३६५ रुपये करण्याचे आश्‍वासन दिले आहे.  भाजपकडून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा यांनी चहापट्ट्यामध्ये सभांचा सपाटा लावला.

भाजपची आश्‍वासने
भाजपच्या जाहीरनाम्यातही चहा कामगारांवर आश्‍वासनांची बरसात करण्यात आली आहे. आसाम चहा बागीचर धन पुरस्कार मेळा योजनेच्या माध्यमातून बारा हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. सध्या विविध टप्प्यांत तीन हजारांची मदत दिली जाते. काँग्रेसने जाहीरनाम्यात कामगारांना मोफत वीज, भूमिहीनांना जमिनीचे अधिकार, वेगळ्या चहा मंत्रालयाची स्थापना आदी आश्‍वासने दिली .

आश्‍वासनांवर विश्‍वास नाही
भाजपचा मित्र आसाम गण परिषद आणि आसाम जतिया परिषद या पक्षांनीही कामगारांवर आश्‍वासनांची बरसात केली आहे. चहा कामगारांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची ग्वाही जतिया परिषदेने दिली आहे. प्रत्यक्षात चहा कामगारांनी मात्र कोणत्याच राजकीय पक्षांच्या आश्‍वासनांवर आमचा विश्‍वास नसल्याचे म्हटले आहे. 

भाजपने २०१६ च्या निवडणुकीत दिलेली आश्‍वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत. काँग्रेसने मात्र चहा कामगारांच्या मागण्यांना न्याय दिला आहे.
- रिपुण बोरा, प्रदेशाध्यक्ष आसाम

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com