esakal | आसाममध्ये रोजगारनिर्मिती करू; राहुल गांधींनी दिलं पाच गोष्टींचं वचन
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi

राहुल गांधी यांनी आसाममध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तर पाच लाख रोजगारांची निर्मिती केली जाईल आणि सरकारी भरती मोठ्या प्रमाणात सुरू केली जाईल, असे आश्‍वासन दिले.

आसाममध्ये रोजगारनिर्मिती करू; राहुल गांधींनी दिलं पाच गोष्टींचं वचन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मारीएैनी/जोरहाट - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ देशातील दोन-तीन उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहेत. लहान व्यापारी, शेतकरी आणि मजुरांसाठी सरकार काहीच काम करत नाही, अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. आसाम विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने  येथे आयोजित सभेत राहुल गांधी यांनी आसाममध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तर पाच लाख रोजगारांची निर्मिती केली जाईल आणि सरकारी भरती मोठ्या प्रमाणात सुरू केली जाईल, असे आश्‍वासन दिले. राहुल गांधी म्हणाले, की केंद्र सरकारकडून सातत्याने गॅसचे भाव वाढवले जात आहे. या माध्यमातून आपल्या खिशातील पैसा हा दोन-तीन उद्योगपतींना देण्याचे काम केले जात आहे. नोटाबंदी आणि जीएसटीचा उल्लेख करताना ते म्हणाले, की काळ्या पैशाचे काही झाले नाही मात्र आसामची प्लायवूड इंडस्ट्री बंद पडली. 

आम्ही पाच गोष्टी देण्याचे वचन दिले आहे. पहिले म्हणजे सीएए कायदा आसाम किंवा देशात लागू होऊ देणार नाही, आम्ही चहामळ्यात काम करणाऱ्या मजुरांना ३६५ रुपये मजुरी देणार, राज्यातील सर्व कुटुंबांना २०० युनिट मोफत वीज देणार, महिलांना दरमहा २००० रुपये देणार आणि राज्यात पाच लाख रोजगारांची निर्मिती करणार. राज्यात मोठ्या प्रमाणात सरकारी खात्यात भरती सुरू केली जाईल. उद्योगामार्फत लाखो लोकांना रोजगार दिला जाईल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. हाच कॉंग्रेस आणि भाजपमधील फरक आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण करू
राहुल गांधी यांनी कृषी कायद्याचा उल्लेख करत म्हटले की, सरकार शेतकऱ्यांवर आक्रमण करत आहे. तीन कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडील सर्वकाही हिरावण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आपली संस्कृती, भाषा आणि बंधुभाव या गोष्टींवर भाजप आणि संघांकडून हल्ले केले जात आहे. आम्ही आपल्या भाषेचे, संस्कृतीचे आणि परंपरेचे संरक्षण करू इच्छित आहोत. हा भाग आपला आहे. त्यावर नागपूरवरून राज्य केले जाणार नाही.

 आम्ही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे कर्जमाफीचे आश्‍वासन दिले होते. छत्तीसगडमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर सहा तासातच कर्ज माफ केले होते. आसाममध्ये आमचे सरकार आल्यास प्रत्येक चहा मजुराला ३६५ रुपये मिळतील.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते

loading image