Assam Police | महिला पोलिसाने पतीलाच केली अटक; समोर आलं धक्कादायक सत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jonamani rabha
महिला पोलिसाने पतीलाच केली अटक; समोर आलं धक्कादायक सत्य

महिला पोलिसाने पतीलाच केली अटक; समोर आलं धक्कादायक सत्य

आसामच्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने लग्नाआधीच आपल्या भावी पतीला अटक केली आहे. या व्यक्तीने खोटी ओळख सांगून लग्न करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासोबतच इतर काही लोकांचीही फसवणूक केली होती. या प्रकरणातल्या चौकशीनंतर या पोलीस उप निरीक्षकाने आपल्या भावी पतीला अटक केली आहे. आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे प्रकरण आसाममधल्या (Assam) नगांव जिल्ह्यातलं आहे. नगांव पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक जोनमणि राभा यांनी आपला भावी पती राणा पगगला खोटी ओळख सांगून लग्न करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसंच दोन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.

जोनमणि यांनी सांगितलं की, माजुली इथं काम करत असताना जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी आणि पगगची भेट झाली. या दरम्यान पगगने आपण ONGC चा जनसंपर्क अधिकारी असल्याचं सांगितलं. भेटीनंतर काही दिवसांनी पगगने जोनमणिला लग्नाची मागणी घातली. जोनमणि यांनी ती स्वीकारल्यानंतर दोन्ही परिवारांची भेट झाली आणि त्यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये साखरपुडा केला आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांचं लग्न होणार होतं.

२०२२ च्या सुरुवातीला जोनमणि यांना पगगच्या कामाच्या पद्धतीबद्दल शंका वाटू लागली. कारण जोनमणि यांनी स्वतः जनसंपर्क आणि जाहिरात या विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी काही लोकांची भेट घेतली आणि त्यांची शंका खरी ठरली. या लोकांनी जोनमणि यांना सांगितलं की पगगने काँट्रॅक्ट देण्याच्या नावाखाली २५ लाख रुपये लुटले आहेत. चौकशीनंतर जोनमणि यांना लक्षात आलं की पगग ONGC मध्ये काम करत नाही.

जोनमणि यांना हेही लक्षात आलं की पगगकडे एक एसयुव्ही गाडी होती, जी त्याने भाड्याने घेतली होती. तसंच त्याने एक खासगी सुरक्षारक्षक आणि वाहनचालकही सोबत ठेवला होता, जेणेकरून तो उच्चस्तरीय अधिकारी असल्याचं भासवू शकत होता. जोनमणि यांनी सांगितलं की सत्य समोर आल्यानंतर मी त्याच्यावर कारवाई केली. आम्ही अनेक बनावट ओळखपत्र, आक्षेपार्ह कागदपत्रं, एक लॅपटॉप, अनेक मोबाईल फोन आणि चेक बुक जप्त केली आहे. मला कोणताही पश्चाताप होत नाही उलट मी देवाचे आभार मानते. मी आसामच्या लोकांना हा संदेश देऊ इच्छिते की जर कोणी काही चुकीचं करत असेल तर मी त्याला सोडणार नाही, माझ्या कुटुंबातल्या सदस्यांनाही नाही.

Web Title: Assam Female Police Arrested His Own Husband For Fraud

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AssamAssam Police
go to top