नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ठरून इतिहास रचणारे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना सोमवारी भारताचा सर्वोच्च शांतताकालीन लष्करी सन्मान ‘अशोक चक्र’ जाहीर करण्यात आला..मागील वर्षी जूनमध्ये ‘अॅक्सिऑम-४’ मोहिमेचा भाग म्हणून शुक्ला अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आणि अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय बनले. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दलांतील ७० जणांना शौर्य पुरस्कार जाहीर केले असून, त्यापैकी सहा जणांना मरणोत्तर सन्मान प्रदान करण्यात येणार आहे..सन १९८४ मध्ये रशियाच्या ‘सोयुझ’ यानातून अंतराळात गेलेल्या राकेश शर्मा यांच्या उड्डाणानंतर तब्बल ४१ वर्षांनी शुक्लांनी १८ दिवस अंतराळ प्रवास केला. लढाऊ वैमानिक म्हणून शुक्ला यांचा अनुभव उल्लेखनीय असून, विविध विमानांवर त्यांचा दोन हजार तासांचा उड्डाण अनुभव आहे. यात एसयू-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जॅग्वार, हॉक, डोर्नियर आणि ‘एएन-३२’ या विमानांचा समावेश आहे..अंतराळ क्षेत्राला सरकारचे महत्त्व असल्याने शुभांशु शुक्ला यांना ‘अशोक चक्र’ जाहीर करण्यात आल्याचे म्हटले जाते. कारण हा प्रतिष्ठेचा सन्मान साधारणपणे असामान्य शौर्य दाखवणाऱ्या लष्करी कर्मचाऱ्यांनाच प्रदान केला जातो.राष्ट्रपतींनी ७० कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार जाहीर केले. त्यामध्ये मरणोत्तर सन्मान मिळणाऱ्यांची संख्या सहा आहे. या पुरस्कारांमध्ये एक अशोक चक्र, तीन कीर्ती चक्र, १३ शौर्य चक्र (त्यापैकी एक मरणोत्तर), एक सेना पदक (शौर्य)आणि ४४ सेना पदके (शौर्य) यांचा समावेश आहे..महिला नौदल अधिकाऱ्यांचा गौरवभारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए या महिला अधिकाऱ्यांचा शौर्य चक्राने गौरव करण्यात आला आहे. आठ महिन्यांच्या कालावधीत भारतीय नौदलाच्या ‘आयएनएसव्ही’ तारिणीवरून २१,६०० सागरी मैल (सुमारे ४०,००० किमी) अंतर कापून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून त्यांनी इतिहास रचला होता..कीर्ती चक्र पुरस्कार १ आसाम रायफल्सचे मेजर अरशदीप सिंग, २ पॅरा (स्पेशल फोर्सेस)चे नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर यांना प्रदान करण्यात येतील. नायर हे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमे ‘गगनयान’साठी प्रशिक्षण घेतलेल्या चार अंतराळवीरांपैकी एक होते. १३ शौर्य चक्र पुरस्कारांपैकी १० पुरस्कार लष्करातील कर्मचाऱ्यांना (त्यापैकी एक मरणोत्तर), दोन नौदलातील कर्मचाऱ्यांना आणि एक निमलष्करी दलातील अधिकाऱ्याला देण्यात येईल..शौर्य चक्र पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये २१ पॅराचे (स्पेशल फोर्सेस) लेफ्टनंट कर्नल घाटगे आदित्य श्रीकुमार, ३२ आसाम रायफल्सचे मेजर अंशुल बाल्टू, ५ पॅरा (स्पेशल फोर्सेस)चे मेजर शिवकांत यादव, ४२ राष्ट्रीय रायफल्सचे मेजर विवेक मेच, ११ पॅराचे (स्पेशल फोर्सेस) मेजर लेइशांगथेम दीपक सिंग आणि ६ पॅराचे (स्पेशल फोर्सेस) कॅप्टन योगेंद्र सिंग ठाकूर यांचा समावेश आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.