'सदैव अटल' सज्ज ....!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

नवी दिल्ली: "मै जी भर के जिया, मौत से क्‍यूं डरू...,'' असे म्हणत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ जनतेसाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हे स्मृतिस्थळ तयार करण्यासाठी एकाही वृक्षाची कत्तल करण्यात आलेली नाही. "सदैव अटल' नामक या स्मृतिस्थळावर उद्या (ता.25) अटलजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या पहिल्या प्रार्थनासभेच्या तयारीवर आज अखेरचा हात फिरविण्यात आला.

नवी दिल्ली: "मै जी भर के जिया, मौत से क्‍यूं डरू...,'' असे म्हणत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ जनतेसाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हे स्मृतिस्थळ तयार करण्यासाठी एकाही वृक्षाची कत्तल करण्यात आलेली नाही. "सदैव अटल' नामक या स्मृतिस्थळावर उद्या (ता.25) अटलजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या पहिल्या प्रार्थनासभेच्या तयारीवर आज अखेरचा हात फिरविण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, अटलजींचे दीर्घकालीन सहकारी लालकृष्ण अडवानी व उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू व विजय गोयल यांच्यासह अनेक मंत्री उद्याच्या कार्यक्रमास हजर राहतील. अटलजींना उद्या सकाळी संसदेत आदरांजली वाहण्यात येईल. त्यानंतर येथे अटल स्मृती न्यासातर्फे उद्याच्या प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले आहे. अटलजींना अखेरचा निरोप देण्यात आला त्या दीड एकर जागेवर कमळाच्या पाकळ्यांच्या आकारात मुख्य स्मृतिस्थळ संगमरवरात बनविण्यात आले आहे. या देखण्या कमळाभोवती गोलाकारात असलेल्या विविध स्तंभांवर व भिंतीवरही अटलजींच्या "गीत नया गाता हूँ', "मौत की उम्र क्‍या? दो पल भी नहीं', "मैं जी भर जिया' आदी प्रसिद्ध काव्यपंक्ती कोरण्यात आल्या आहेत.

या वर्षी 16 ऑगस्टला वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर मोदी सरकारने तातडीने या स्मृतिस्थळाचे काम सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या कामाचा नियमितपणे आढावा घेण्यात येत होता व "कोठेही कसूर राहता कामा नये,' अशा सक्त सूचना दिल्ली भाजप नेत्यांनाही देण्यात आल्या होत्या. उद्याच्या प्रार्थनासभेला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा सभापती यांच्यासह विरोधी पक्षनेतेही उपस्थित राहतील, असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. अटलजींशी विलक्षण स्नेह असणाऱ्या कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी कार्यक्रमासाठी येणार असल्याचे कळविले आहे. अटल स्मृती न्यासाचे अध्यक्ष मल्होत्रा यांनी सांगितले, की अटलजींचे पर्यावरणप्रेम अतिशय कटाक्षाने लक्षात ठेवून या स्मृतिस्थळाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळेच त्याची उभारणी करताना परिसरातील एकही वृक्षच काय, पण त्याची फांदीही तोडली जाणार नाही, याची अतिशय काळजी घेतली गेली.

दिवंगत राष्ट्रपती-पंतप्रधानांच्या स्मृती
राष्ट्रीय स्मृतिस्थळ सात किलोमीटर अंतरात विस्तारले आहे. त्यातील दीड एकर जागेवर अटल स्मृतिस्थळ आकारास आले आहे. माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, आर. वेंकटरमन, शंकरदयाळ शर्मा, के. आर. नारायणन, माजी पंतप्रधान आय. के. गुजराल, व्ही. पी. सिंह, चंद्रशेखर यांच्या समाध्या येथे आहेत. दिल्लीत अंत्यसंस्कार होणेही नशिबी नसलेले मुक्त अर्थव्यवस्थेचे उद्गाते माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचीही स्मृती अंग चोरून या परिसरात उभी असलेली पाहावयास मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atal Bihari Vajpayees Memorial open in New Delhi