अटलजींची तुलना केवळ नेहरू व इंदिरांजीशीच करावी लागेल- माधव भंडारी

सोमवार, 20 ऑगस्ट 2018

अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झालीच तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, इतके अफाट काम अटलजींनी केल्याचे भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले. 

मुंबई : अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झालीच तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, इतके अफाट काम अटलजींनी केल्याचे भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले. 

मुंबई येथे काल (ता.19) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना शब्दसुमनांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र एकता अभियान आणि राजहंस प्रकाशन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भंडारी बोलत होते. यावेळी, आमदार अशिष शेलार, पोखरण चाचणीत महत्वाची भूमिका बजावणारे सुरेश हावरे, लेखक सारंग दर्शने, भाजप नेते मधु चव्हाण, ऑर्कीडचे विठ्ठल कामत उपस्थित होते.

माधव भंडारी म्हणाले की, "अटलजींचा सहवास ज्यांना लाभले ते भाग्यवान आहेत. देशातील सगळ्या महानगरांना रस्त्यांनी जोडल्यामुळे देशातील गाव महानगरांना जोडली गेली. यामुळे, देशाचा वेगवान विकास झाला. जगभरात विखूरलेल्या भारतीयांना एकजूट करण्याचे काम अटलजींनी केले. त्यांच्यामुळे अनिवाशी भारतीयांनी भारतात गुंतवणूक केली. अटलजींचे देशाच्या विकासातील योगदानाविषयी चर्चा करायची झाली. तुलना करायची झालीच तर ती केवळ नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागणार आहे. अटलजींनी देशाच्या अण्विक विकासामध्ये मोलाचे योगदान दिल्यानेच अमेरिकेसारख्या देशाला भारताबरोबर अणू करार करावा लागल्याचे भंडारी यांनी नमूद केले." 

यावेळी आमदार मधू चव्हाण म्हणाले की, " पुराणकाळात श्रीकृष्णाला पुर्णपुरूष म्हणटले जायचे. छत्रपती शिवरायांना पुर्णपुरूष म्हणटले जायचे. त्यानंतर अटलजींना पुर्ण पुरूष म्हणावं लागले. 1 मताने सरकार पडले पण अटलजींनी मुल्यांना सोडले नाही. मत विकत घेणे शक्य होते पण अटलजींने ते केले नाही." 

राजहंस प्रकाशनातर्फे सारंग दर्शने यांनी लिहिलेल्या "अटलजी" या पुस्तकाचे काही महिन्यांपूर्वी प्रकाशन झाले होते. या पुस्तकासंबंधी अटलजींवर परिसंवादाचा कार्यक्रम आयोजलेला होता. मात्र, 16 ऑगस्ट रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर हा कार्यक्रम शब्दसुमनांजलीत परावर्तीत करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atal ji has to be compared to Nehru and Indira gandhi only says Madhav Bhandari