esakal | 9.2 किमी लांब अटल बोगद्यासाठी 3 हजार 200 कोटींचा खर्च; काय आहेत वैशिष्ट्ये
sakal

बोलून बातमी शोधा

atal tunnel

अटल टनेलचं काम 2010 मध्ये सुरू कऱण्यात आले होते. 6 वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा असलेल्या कामाला 10 वर्षांचा कालावधी लागला. 

9.2 किमी लांब अटल बोगद्यासाठी 3 हजार 200 कोटींचा खर्च; काय आहेत वैशिष्ट्ये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहतांग - जगातील सर्वात लांब अटल बोगद्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मनालीत पोहोचले आहेत. रोहतांग पास इथं असलेला हा बोगदा समुद्र सपाटीपासून 3 हजार 60 मीटर उंचीवर आहे. हा बोगदा खुला झाल्यानं हिमाचल प्रदेशातील अनेक भाग जिथं बर्फवृष्टीच्या काळात वाहतूक ठप्प होते ती आता सुरू राहिल.

मनाली आणि लेहमधील अंतरही यामुळे जवळपास 50 किलोमीटरने कमी होणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या या बोगद्याची लांबी 9 किमी इतकी आहे. मनाली लेह हायवेवर रोहतांग, बारालचा, लुंगालाचा ला आणि तालंग ला यांसारखे पास आहेत पण बर्फवृष्टीच्या काळात इथून जाणं अशक्य होते. याआधी मनाली ते सिस्सू अंतर पार करण्यासाठी 5 ते 6 तास लागत होते ते आता फक्त एक तासात जाता येणार आहे. अटल बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने तयार केला आहे. 

बोगद्यातून प्रवासावेळी वेगाची मर्यादा
अटल बोगद्यातून प्रवास करताना वेगाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. सुरुवातीच्या 400 मीटर अंतरात 40 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवता येईल. तिथून पुढे 80 किमी प्रतितास वेगाची मर्यादा आहे. बोगद्याच्या दोन्ही टोकाला एन्ट्री बॅरिअर्स लावण्यात आले आहेत. तसंच 150 मीटर अंतरावर आपत्कालिन संपर्कासाठी टेलिफोन कनेक्शन आहेत. 

हे वाचा - Covid Update - कोरोनाने देशात घेतले 1 लाख बळी; एकूण रुग्ण 64 लाखांवर

सुरक्षेसाठी ठिकठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर
दर 60 मीटर अंतरावर सुरक्षेच्या दृष्टीने फायर हायड्रेंट मेकॅनिजम आहे. आग लागल्यास ती लवकरात लवकर आटोक्यात आणता येईल. तसंच बोगद्यामध्ये 250 मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पूर्ण टनेलसाठी एक ब्रॉडकास्टिंग टनेल तयार करण्यात आलं आहे. 

10 वर्षे काम आणि 3200 कोटी खर्च
अटल बोगदा सिंगल ट्यूब आणि डबल लेनचा आहे. याची उंची 10.5 मीटर इतकी रुंदी असलेल्या बोगद्यात 6.3 X 2.25 मीटरचे फायरप्रूफ इमर्जन्सी इग्रेस टनल तयार करण्यात आलं आहे. अटल टनेलचं काम 2010 मध्ये सुरू कऱण्यात आले होते. 6 वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा असलेल्या कामाला 10 वर्षांचा कालावधी लागला. दररोज 3 हजार कार आणि 1500 ट्रक प्रवास करू शकतील या दृष्टीनं बोगद्याचं काम करण्यात आलं आहे. 15 हजार टन स्टीलचा वापर या कामात करण्यात आला असून जवळपास 3200 कोटी रुपयांचा खर्च यासाठी आला आहे. 2005 मध्ये याला 970 कोटी खर्च येणार होता मात्र कामाला उशिर झाल्यानं तीन पट जास्त खर्च आल्याचं मोदी उद्घाटनावेळी म्हणाले.