अयोध्या निकाल प्रकरणी 'तारिख पे तारिख'; नवे घटनापीठ होणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जानेवारी 2019

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी यापूर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना केली होती. या घटनापीठामध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. व्ही. रामण्णा, न्या. यू. यू. ललित आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश होता. पण, आज सुनावणीपूर्वी ललित यांनी घटनापीठातून माघार घेतली.

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमिनी संदर्भातील वादाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात आज (गुरुवार) पुन्हा एकदा तारिख पे तारिख पाहायला मिळाले. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी बनविलेल्या घटनापीठातून न्यायमूर्ती यू. यू. ललित यांनी माघार घेतल्याने आता नवे घटनापीठ स्थापन होणार आहे. आता या प्रकऱणाची सुनावणी 29 जानेवारीला होणार आहे. 

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी यापूर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना केली होती. या घटनापीठामध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. व्ही. रामण्णा, न्या. यू. यू. ललित आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश होता. पण, आज सुनावणीपूर्वी ललित यांनी घटनापीठातून माघार घेतली. ललित हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे वकिल होते. त्यामुळे त्यांच्या सहभागावर प्रश्न उपस्थित झाल्याने त्यांनी घटनापीठातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. तसेच या प्रकऱणाशी संबंधित कागदपत्रांची भाषांतर प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास सरन्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणीस खटला आला. पण, ललित यांनी माघार घेतल्याने सुनावणी पुढे गेली. तत्पूर्वी 4 जानेवारी रोजीच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी वेगळे घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये 14 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, उच्च न्यायालयाने अयोध्येतील 2.77 एकर जागेचे त्रिभाजन करण्याचे आदेश दिले होते. सुन्नी क्वफ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांना ही जमीन विभागून देण्यात आली होती. मागील वर्षी 29 ऑक्‍टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये या प्रकरणाची सुनावणी योग्य पीठासमोर घेण्याचे निश्‍चित केले होते. आता ही तारिख 29 जानेवारीपर्यंत पुढे गेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayodhya Hearing Deferred To January 29 After Top Court Judge Exits Case