रामजन्मभूमीचा आज निकाल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाबाबत सर्वोच्च न्यायालया उद्या (ता. ९) निकाल देणार आहे. न्यायालय सकाळी साडेदहा वाजता निर्णय देण्याची शक्‍यता आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या खंडपीठाने ४० दिवसांच्या सुनावणीनंतर १६ ऑक्‍टोबर रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता.

नवी दिल्ली - रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाबाबत सर्वोच्च न्यायालया उद्या (ता. ९) निकाल देणार आहे. न्यायालय सकाळी साडेदहा वाजता निर्णय देण्याची शक्‍यता आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या खंडपीठाने ४० दिवसांच्या सुनावणीनंतर १६ ऑक्‍टोबर रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. 

दरम्यान, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांकडून राज्यातील सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्ताचा आढावा घेतला. सरन्यायाधीशांच्या चेंबरमध्येच ही बैठक झाली, या बैठकीस उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजेंद्रकुमार तिवारी आणि पोलिस महासंचालक ओमप्रकाश सिंह हे दोघे उपस्थित होते. या दोन्ही अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध उपाययोजनांची माहिती गोगोई यांना दिली. या चर्चेचा नेमका तपशील मात्र समजू शकलेला नाही. अयोध्या प्रकरणाची सुनावणी ही सोळा ऑक्‍टोबर रोजीच संपली असून, आता अवघ्या देशाचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येमध्येदेखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, या जिल्ह्याची रेड, यलो, ग्रीन आणि ब्लू झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

अयोध्येतच ४८ वेगळे सेक्‍टर तयार करण्यात आले असून, वाद्‌ग्रस्त परिसर हा रेडझोनमध्ये ठेवण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने या भागामध्ये निमलष्करी दलाच्या आणखी शंभर तुकड्या तैनात करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशातही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सहा हजार लोकांना रेड कार्ड
उत्तर प्रदेश पोलिसांनी बरेली विभागामध्ये सहा हजार लोकांना रेड कार्ड बजावले असून, त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येईल. या सगळ्या मंडळींना समाजकंटकांच्या यादीत टाकण्यात आले आहे. बरेली झोनमध्ये शहाजहाँपूर, बदायूँ, पिलिभीत, रामपूर, मुरादाबाद, संभळ, अमरोहा यांचा समावेश असून, बिजनौरमध्ये चार हजार लोकांना रेड कार्ड बजावण्यात आले आहे. राज्यातील ९० विविध स्थळांना संवेदनशील स्थळांच्या यादीमध्ये टाकण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayodhya ram temple result supreme court