कुबेर पुन्हा कर्ण झाला

वृत्तसंस्था
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

भारतीय उद्योगविश्‍वातील अझीम प्रेमजी नावाच्या कुबेराने पुन्हा एकदा कर्णाचा दानशूरपणा दाखवीत समाजकार्यासाठी मुक्तहस्ते मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. अझीम प्रेमजी आणि विप्रोच्या प्रमोटर समूहाने 7,300 कोटी रुपये मूल्याच्या शेअरची बायबॅकच्या माध्यमातून विक्री केली आहे. या भांडवलातील मोठा हिस्सा सेवाभावी काम आणि समाजसेवेसाठी वापरला जाणार आहे.

कंपनीचे 7,300 कोटींचे शेअर विकले
बंगळूर - भारतीय उद्योगविश्‍वातील अझीम प्रेमजी नावाच्या कुबेराने पुन्हा एकदा कर्णाचा दानशूरपणा दाखवीत समाजकार्यासाठी मुक्तहस्ते मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. अझीम प्रेमजी आणि विप्रोच्या प्रमोटर समूहाने 7,300 कोटी रुपये मूल्याच्या शेअरची बायबॅकच्या माध्यमातून विक्री केली आहे. या भांडवलातील मोठा हिस्सा सेवाभावी काम आणि समाजसेवेसाठी वापरला जाणार आहे.

विप्रोने 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 32 कोटी इक्विटी शेअरची 325 रुपये प्रतिशेअरप्रमाणे बायबॅक करण्याची घोषणा केली होती.

बायबॅकसाठी वापरली जाणारी एकूण रक्कम (हे भांडवल टेंडर प्रकाराने वापरले जाणार आहे) 10,499.99 कोटी रुपये इतकी होती. अझीम प्रेमजींच्या मालकी हिश्‍यातील 2.2 कोटी शेअर या बायबॅकच्या माध्यमातून खरेदी करण्यात आले आहेत. प्रेमजींच्या मालकीच्या एकूण शेअरच्या 3.96 टक्के इतका हा हिस्सा आहे. यातील मोठा हिस्सा हा अझीम प्रेमजी फाउंडेशनसाठी वापरला जाण्याची चिन्हे आहेत. अझीम प्रेमजी फाउंडेशन ही जगातील पाचव्या क्रमांकाची आणि आशियातील सर्वांत मोठी सेवाभावी संस्था आहे. प्रेमजी जुलै महिन्यात विप्रोच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांचे सुपुत्र रिषाद प्रेमजी यांनी विप्रोची धुरा सांभाळली आहे.

देशातील श्रीमंत व्यक्ती
अझीम प्रेमजी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 18 अब्ज डॉलर इतकी आहे. मार्च महिन्यात त्यांनी विप्रोच्या एकूण शेअरपैकी 34 टक्के शेअर म्हणजेच 52,750 कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी दान केले होते. आतापर्यंत अझीम प्रेमजी यांनी प्रेमजी फाउंडेशनसाठी तब्बल 1 लाख 45 हजार कोटी रुपये (21 अब्ज डॉलर) इतकी प्रचंड रक्कम दान केली आहे. आज दिवसअखेर विप्रोचा शेअर राष्ट्रीय शेअर बाजारात 245.20 रुपये प्रतिशेअर या पातळीवर होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: azim premji social work help