शेतकरी आंदोलनाची धग वाढली; संत बाबा राम सिंग यांची आत्महत्या

टीम ई सकाळ
Wednesday, 16 December 2020

शेतकरी आंदोलनात आता एक खळबळजनक अशी घटना घडली आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

नवी दिल्ली - दिल्ली हरियाणाच्या सिंघु सीमेवर गेल्या तीन आठवड्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलनात आता एक खळबळजनक अशी घटना घडली आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गोळी झाडून घेतल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाबा राम सिंह हे कर्नाल इथं राहत होते. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाइड नोटही सापडली आहे. त्यात शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करण्यात आला असून त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला असल्याचं म्हटलं आहे. बाबा राम सिंह यांचे सेवक गुरमीत सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बाबाजींचे हरियाणा आणि पंजाबसह जगभरात लाखोंच्या संख्येनं अनुयायी आहेत. 

हे वाचा - सरकार आणि शेतकऱ्यांची समिती स्थापन करा, आतापर्यंत प्रश्न का सुटला नाही? - SC

सुसाइड नोट

शेतकऱ्यांचं त्यांच्या हक्कासाठी दु:ख पाहिलं आहे. रस्त्यावर त्यांना पाहून मला दु:ख झालं आहे. सरकार त्यांना न्याय देत नाही. हा अन्याय आहे.जो अन्याय करतो तो पापी आहे. अन्याय सहन करणं हेसुद्धा पाप आहे. कोणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तर कोणी अन्यायाविरुद्ध काही केलं आहे. कोणी पुरस्कार परत देऊन आपला राग व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, सरकारी अन्यायावर राग असताना सेवक आत्महत्या करतोय. हा अन्यायाविरोधातील आवाज आहे. हा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज आहे. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह

याआधी कुंडली सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात मंगळवारी एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील भिंडर कला इथले रहिवाशी मक्खन खान इतरांसह कुंडली सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. 

हे वाचा - ऊस उत्पादकांना मोदी सरकारने दिली गोड बातमी; 5 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ

कृषी कायद्याविरोधात तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर दिल्ली, हरियाणातून आलेले शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा होऊनही काहीच मार्ग निघालेला नाही. शेतकरी तीन कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baba ram singh suicide during farmers protest