फुटबॉल खेळणारं हत्तीचं पिल्लू पाहायचंय का? व्हायरल झालाय व्हिडीओ |Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल खेळणारं हत्तीचं पिल्लू पाहायचंय का? व्हायरल झालाय व्हिडीओ

फुटबॉल खेळणारं हत्तीचं पिल्लू पाहायचंय का? व्हायरल झालाय व्हिडीओ

लहान मुलांना खेळताना आपण नेहमी पाहतो, पण तुम्ही कधी हत्तीच्या पिल्लाला खेळताना पाहिलं आहे का? एखादं गोंडस हत्तीचं पिल्लू खेळताना पाहून किती मजा येईल ना? त्यातही हत्तीच्या पिल्लाला फुटबॉल खेळताना पाहणं, हा तर एक वेगळाच आनंद ठरू शकतो. हत्तीच्या एका गोंडस पिल्लाचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही खूश व्हाल. हे पिल्लू खेळायचं थांबूच नये, असं तुम्हाला वाटेल.

या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एका सुंदर हिरव्यागार पार्कमध्ये एका छोट्या डबक्याशेजारी दोन हत्ती उभे आहेत. त्यांच्या सोबत एक छोटं गोंडस पिल्लू उभं आहे. त्या हत्तीच्या पिल्लाची डबक्याकडे नजर जाते. डबक्यात त्याला एक लाल रंगाचा बॉल तरंगताना दिसतो. फुटबॉलच्या आकाराचा हा बॉल पाहून हत्तीचं पिल्लू अचानक रंगात येते आणि तुरुतुरु चालत त्या डबक्यात उतरतं. बॉलजवळ पोचताच एखाद्या फुटबॉलपटूलाही लाजवेल अशा पद्धतीने त्या बॉलला किक मारतं. त्याला अजून मजा येते. मग ते अशाच किक मारत, मजा करत डबक्याच्या दुसऱ्या टोकाला येते आणि शांत उभं राहतं.

आता ते पाण्यात मटकन बसतं आणि गडगड लोळू लागतं. जणू काही त्याने गोल केला आहे आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन चालू आहे, असाच भास व्हावा. लोळताना त्याची अदाकारी पाहून गंमत येते. यादरम्यान त्याची लांबलचक सोंड, इवलंस शेपूट, सुपाएवढे कान यांची मजेशीर हालचाल पाहून मन प्रसन्न होतं. थोडं लोळून झाल्यावर पिल्लू पुन्हा उठतं आणि पुन्हा त्याच्या फुटबॉलचा दुसरा हाफ सुरू होतो. ते पुन्हा त्याच स्टाईलनं बॉलला किक करत दुसऱ्या बाजूला नेते. यावेळी तो चेंडू डबक्याबाहेर घालवतं. जसं काही दुसरा गोलच केला आहे. या अविर्भावात पुन्हा त्याचं सेलिब्रेशन सुरु होतं. अतिशय स्टाईलमध्ये ते पाठीमागे चालत जाते. यादरम्यान त्यांचा रुबाब, हटके स्टाईल, ऐटदारपणा पाहून मजा येते. हत्तीच्या पिल्लाच्या गुडघाभर पाण्यातील या फुटबॉलनं वेड नाही लावलं तर नवलच....

हत्तीच्या पिल्लाच्या या निरागसतेने लोकांना भुरळ घातली नसती तरच नवल. या पिल्लानं फुटबॉलवर मारलेली किक लोकांच्या हृदयाला स्पर्श करून जात आहे. म्हणूनच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

loading image
go to top