
Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्रींचं पाकिस्तानबद्दल खळबळजनक विधान; नव्या वादाला तोंड फोडलं
नवी दिल्लीः भारताला हिंदुराष्ट्र बनवण्याचं स्वप्न बघणारे बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पाकिस्तानबद्दल विधान केलं आहे. शिवाय त्यांनी आशिया खंडातल्या लोकांमध्ये राम-कृष्णाचं रक्त आहे, असं म्हटलंय.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, पाकिस्तान हा भारताचा एक भाग होता. त्यांनी भारताला पाकिस्तानचा बाप म्हणत बाप आणि मुलगा भेटीसाठी तयार आहेत, असं विधान केलं आहे.
'पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र असलं तरी ते फक्त त्यांच्यापुरतं आहे. मुळात भारत आणि आशियामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हृदयावर दगड ठेवून खरं बोलला तर त्यांच्या धमण्यांमध्ये राम-कृष्णाचं रक्त वाहात आहे, हे सिद्ध होईल.'
हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, हिंदुंनी हिंदू राष्ट्राची मागणी केली पाहिजे. याबाबत स्वतः हिंदूच निर्णय घेऊ शकतात. असं म्हणून त्यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, असं विधान केलं आहे.
मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेशातल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री चमत्कारांच्या दाव्यांवरुन चर्चेत आलेले आहेत. बागेश्वर बाबा हे मनातलं ओळखतात आणि लोकांचे प्रश्न सोडवतात, या दाव्यावरुन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला होता.