बाटला हाउस चकमकीत शहीद पोलिस निरिक्षक शर्मांना शौर्य पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

बाटला हाउस एन्काउंटरमध्ये शहीद झालेल्या दिल्ली पोलिसातील निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना मरणोत्तर शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - बाटला हाउस एन्काउंटरमध्ये शहीद झालेल्या दिल्ली पोलिसातील निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना मरणोत्तर शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मोहन चंद शर्मा हे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकात कार्यरत होते. शुक्रवारी गृह मंत्रालयाने शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. देशातील 215 पोलिसांना शौर्य पुरस्कार देण्याथ आला आहे. यामध्ये मरणोत्तर पुरस्कारांचाही समावेश आहे. 

दिल्लीतील बाटला हाउस एन्काउंटर दिल्लीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर झाला होता. 13 सप्टेंबर 2008 ला दिल्लीत करोल बाग, कॅनॉट प्लेस, इंडिया गेट आणि ग्रेटर कैलाश इथं साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता तर 133 जण जखमी झाले होते.  हा बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिद्दीनने केल्याचं दिल्ली पोलिसांच्या चौकशीत समोर आलं होतं. 

बॉम्बस्फोटानंतर 19 सप्टेंबरला दिल्ली पोलिसांनी माहिती मिळाली होती की, इंडियन मुजाहिद्दीनचे काही दहशतवादी बाटला हाउसमधील एका घरात आहेत. यावेळी मोहन चंद शर्मा यांनी लोधी कॉलनीतील कार्यालयात याची माहिती दिली. तिथून एक पथक बाटला हाऊसला निघाले. यामध्ये राहुल सिंह, एसआई रविंद्र त्यागी, एसआई राकेश मलिक, हावलदार बळवंत, सतेंद्र विनोद गौतम यांचा समावेश होता. तर इन्सपेक्टर मोहन चंद शर्मा अब्बासी चौकात त्यांच्यासोबत आले. त्यानंतर बाटला हाउसच्या बिल्डिंगमध्ये पोलिस जाताच त्यांच्यावर गोळीबार झाला होता. तेव्हा पाच संशयित दहशतवाद्यांना पकडताना त्यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

हे वाचा - न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण दोषी; शिक्षा होणार?

दिल्ली पोलिसात पोलिस उप निरिक्षक म्हणून मोहन चंद शर्मा 1989 मध्ये रुजू झाले होते. फक्त सहा वर्षात पदोन्नती मिळवून ते 1995 मध्ये पोलिस निरिक्षक बनले. मोहन चंद शर्मा यांना कोणत्या शौर्यासाठी पुरस्कार देण्यात आला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. बाटला हाउस चकमकीच्या आधीही त्यांनी काही कारवाया केल्या होत्या. 2009 मध्ये त्यांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित केलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: batla house encounter martyred PI mohan chand sharma gallantry award