
देश आणि परदेशातील आघाडीच्या बिअर उत्पादक कंपन्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली- देश आणि परदेशातील आघाडीच्या बिअर उत्पादक कंपन्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. कार्ल्सबर्ग, सबमिल्लर आणि युनायटेड ब्रुअरिज या बड्या कंपन्यांनी परस्परांशी हातमिळवणी करून आपल्या उत्पादनांच्या किमतीमध्ये फिक्सिंग केल्याची बाब उघड झाली आहे. यामुळे मागील अकरा वर्षांपासून मद्यप्रेमींना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागला आहे. या कंपन्यांनी व्यावसायिकदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या माहितीची आदानप्रदान करण्याबरोबरच परस्परांशी लागेबांधे प्रस्थापित केल्याचे उघड झाले आहे. सरकारच्या अविश्वास चौकशी अहवालातून ही बाब उघड झाली असून हा अहवाल संबंधित वृत्तसंस्थेच्या हाती लागला आहे.
सरकार रेल्वेची महागडी जमीन प्रायवेट कंपनीला देणार; ऑनलाईन लिलाव सुरु
देशाच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) २०१८ मध्ये या तिन्ही कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे घालून चौकशीला सुरवात केली होती. या चौकशीमध्ये या तिन्ही कंपन्यांवर कोणत्याही गैरकृत्याचा ठपका ठेवण्यात आला नसला तरीसुद्धा यामध्ये काही चुकीचे आढळून आले तर या कंपन्यांना मोठा आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली. देशातील बिअरचे मार्केट सात अब्ज डॉलरचे असून त्यामध्ये या बिअर कंपन्यांचा वाटा ८८ टक्के एवढा आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या हाती संभाषण
या कंपन्यांना नेमका किती दंड ठोठवायचा या निर्णय सीसीआयचे सदस्य घेणार आहेत. हा दंड २५० दशलक्ष डॉलरपेक्षाही अधिक असू शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या कंपन्यांच्या बड्या अधिकाऱ्यांमध्ये व्हॉट्सॲप, ईमेल आणि मेसेज यांच्या माध्यमातून झालेला संवाद तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागला असून यातून कंपन्यांनी सातत्याने रणनीती आखून विविध राज्यांतील त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढविल्याचे दिसून आले आहे.