
भाजपमध्ये जाण्यापूर्वी देवाची परवानगी घेतली; काँग्रेस नेते कामत यांचं स्पष्टीकरण
पणजी : गोव्यात बुधवारी काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षांतरानंतर गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवाची परावनगी घेऊनच मी आणि इतर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलं.
दिगंबर कामत यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये आता नेतृत्व शिल्लक राहिलेले नाही. 'भारत जोडो'ला काहीही अर्थ नाही, कारण काँग्रेस राहिलीच नाही. मला न विचारता एलओपीच्या पदावरून हटवण्यात आले. तसेच दिल्लीत बोलावल्यानंतर माझ्याशी एकदाही संवाद साधला गेला नसल्याचं ते म्हणाले.
कामत पुढं म्हणाले की, मी महालक्ष्मी मंदिरात जावून काँग्रेस सोडणार नाही, अशी शपथ घेतली होती. त्यानंतर आता मी देवाशी बोललो. मंदिरात एक प्रक्रिया आहे, ज्यानुसार पुजारी शिवलिंगावर फुल अर्पण करतात. फुल अर्पण केल्यानंतर देवानेच मला भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिल्याचंही कामत यांनी सांगितलं. संपूर्ण गोव्यात माझ्यापेक्षा अधिक कोणीही देवावर विश्वास ठेवत नाही. मी येथील ज्येष्ठ आमदार आहे. मला कोणतं पद द्यायचं की नाही हे मी पक्षावर सोडल्याचंही ते म्हणाले.
गोवा निवडणुकीच्या काही दिवस आधी फेब्रुवारीमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षनिष्ठेची शपथ घेतली होती. मात्र आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह काँग्रेसच्या आठ आमदारांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.