शिंदेंनी अजितदादांना मुख्यमंत्रीपद द्यावं, आम्ही त्यांना...; सुप्रिया सुळेंची 'ऑफर' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule Eknath Shinde

शिंदेंनी अजितदादांना मुख्यमंत्रीपद द्यावं, आम्ही त्यांना...; सुप्रिया सुळेंची 'ऑफर'

मुंबई - Vedanta Foxconn Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर सारवासारव करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती दिली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी थेट एकनाथ शिंदे यांनाच मोठी ऑफर दिली. (supriya sule news in Marathi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदांता पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिल्याची माहिती सुप्रिया सुळे यांना देण्यात आली. त्यावर सुळे म्हणाल्या की, मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना ऑफर देते की, आम्ही तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ आता तुम्ही अजित दादांना मुख्यमंत्री करावं. वेदांता प्रकल्प महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अर्थकारणाचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना माझी विनंती आहे की एकत्र येऊन केंद्र सरकारला विनंती करावी, हा प्रकल्प महाराष्ट्राला द्यावा, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एकीकडे सामंत म्हणतात, दोन महिन्यात प्रकल्प गुजरातला जावू शकत नाही. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनातील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री स्पष्ट म्हणताना दिसतात की, वेदांता प्रकल्प लवकरच महाराष्ट्रात येत आहे. केवळ २१ दिवसांपूर्वी त्यांनी हे विधान केलं होतं. अर्थात त्यांच्या या विधानामुळे वेदांता प्रकल्प २१ दिवसांतच गुजरातला गेल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची घोषणा खरी होती की, उद्योगमंत्री सामंत खरं बोलतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून शिंदे आणि सामंत यांच्यात ताळमेळ नसल्याचं स्पष्ट होतं आहे.