
योग दिनादिवशी बेगुसराय दिवाणी न्यायालयात योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
योग दिनादिवशीच योगगुरू बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांच्यावर गुन्हा दाखल
आज (मंगळवार) योग दिनाच्या दिवशी बेगुसराय दिवाणी न्यायालयात (Begusarai Civil Court) योगगुरू बाबा रामदेव (Yoga Guru Baba Ramdev) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पैसे घेऊनही उपचार न केल्यानं बाबा रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाबा रामदेव यांच्यासह आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बरौनी पोलीस ठाण्यातील नीगामधील रहिवासी महेंद्र शर्मा यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. दोघांविरुद्ध कलम 420, 406, 467, 468,120 ब अन्वये तक्रार पत्र दाखल करण्यात आलंय. जिल्हा न्यायालयाच्या सीजेएम रुम्पा कुमारी यांच्या न्यायालयात ही तक्रार दाखल करण्यात आलीय. बाबा रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल करणारे महेंद्र शर्मा यांनी आरोप केलाय की, ते पतंजली आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड (Patanjali Ayurveda Pvt. Ltd.) आणि महर्षी काटेज योगग्राम झुला यांच्याकडं उपचारासाठी गेले होते. त्यांच्या उपचारासाठी संस्थेनं 90 हजार 900 रुपये जमा केले. मात्र, त्यांच्यावर उपचार केले नाहीत.
दरम्यान, महेंद्र शर्मांनी उपचारासाठी विनंती केली असता, त्यांच्याकडं आणखी एक लाख रुपयांची मागणी केली, असा आरोपही फिर्यादीत केलाय. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयानं हे प्रकरण न्यायदंडाधिकारी मोहिनी कुमारी यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी पाठवलंय. बेगुसराय इथं 3 दिवसांपूर्वी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद पडल्यानं आणि प्रचंड विरोध झाल्यानं ही बाब आता समोर आलीय.