राज्यघटनेत दुरुस्तीने आरक्षणावर गदा नाही - नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

चिक्कोडी - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग कॉंग्रेसला कदापी मान्य नव्हता. त्यांच्या प्रतिभेमुळे कॉंग्रेस नेत्यांची दुकाने चालणार नाहीत, हे ओळखून त्यांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या पाडावासाठी सभा घेतल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेत सर्वाधिक फेरफार कॉंग्रेसनेच केले आहेत. आता भाजपा राज्यघटनेत दुरुस्ती करीत असून आरक्षणावर गदा येणार अशी अनाठायी भीती दलितांना घालण्यात येत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

चिक्कोडी - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग कॉंग्रेसला कदापी मान्य नव्हता. त्यांच्या प्रतिभेमुळे कॉंग्रेस नेत्यांची दुकाने चालणार नाहीत, हे ओळखून त्यांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या पाडावासाठी सभा घेतल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेत सर्वाधिक फेरफार कॉंग्रेसनेच केले आहेत. आता भाजप राज्यघटनेत दुरुस्ती करीत असून आरक्षणावर गदा येणार अशी अनाठायी भीती दलितांना घालण्यात येत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

चिक्कोडी येथे मंगळवारी (ता.1) सायंकाळी बेळगाव जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडताना ते बोलत होते. ते म्हणाले, "देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले आयुष्य वेचले, पण स्वातंत्र्यानंतर देशाचा कारभार एका घराण्याकडे गेला. त्यात त्यांना डॉ. आंबेडकरांचा अडसर नको होता.

डॉ. आंबेडकरांना कॉंग्रेसने भारतरत्न देण्याचे टाळले होते. कॉंग्रेसने इतकी वर्षे दलित व गरिबी हटाओच्या नाऱ्यावर त्यांनी सत्ता उपभोगली, पण त्यांच्यासाठी काहीही केले नाही. म्हणूनच जनतेच्या मोठ्या शक्तीने भाजपाला पूर्ण क्षमतेने सत्तेत आणले आहे. दलितांत विषबिजे पेरणाऱ्यांनी केले नाही ते दलित राष्ट्रपती निवडण्याचे काम भाजपाने केले आहे.' 

मोदी म्हणाले, "भाजपाने 99 पाणी योजनांसाठी 1 लाख कोटी खर्च केले. त्यातील पाच योजना कर्नाटकात आहेत. मोफत माती परिक्षण, फसल विमा योजना, पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉलचा 8 टक्के वापर असे अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. धूळखात पडलेल्या स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी सुरु केली. शेतकऱ्यांच्या पिकांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. 

जनतेमुळे भारताचा गौरव उंचावला

नरेंद्र मोदी म्हणाले, "देशातील शेतकऱ्यांच्या दयनिय अवस्थेला कॉंग्रेसच कारणीभूत आहे. साठ वर्षे सत्ता उपभोगून येथील जनतेच्या हितासाठी कोणतेही कार्य न केलेल्या कॉंग्रेसला भाजपाचा चार वर्षाचा हिशोब मागण्याचा नैतिक अधिकार नाही. 60 वर्षापासून जखडलेल्या आजारावर भाजप उपचार करीत आहे. जागतिक पातळीवर भारताचा गौरव उंचावला आहे, त्याला देशातील 125 कोटी जनता कारणीभूत आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election