आक्रमक येळ्ळूरकरांमुळे अशोक चव्हाणांची सभा रद्द

नागेंद्र गवंडी
शुक्रवार, 4 मे 2018

बेळगाव - आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते असून आमचा अभिमान असल्यास अशोक चव्हाण यांनी आम्हाला भेटायची संधी द्यावी. असा निरोप पोलिसांकडून देताच सीमावासियांच्या भावनेपुढे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर नमते घेतले.

बेळगाव - आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते असून आमचा अभिमान असल्यास अशोक चव्हाण यांनी आम्हाला भेटायची संधी द्यावी. असा निरोप पोलिसांकडून देताच सीमावासियांच्या भावनेपुढे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर नमते घेतले.

येळ्ळूर येथे महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवाराच्या विरोधात ते कॉंग्रेचा प्रचार करणार होते. आक्रमक झालेले समिती कार्यकर्ते जाब विचारण्याचा पवित्रा घेतल्याची माहिती पोलिसांकडून मिळताच अशोक चव्हाण यांनी येळ्ळूर येथील शुक्रवारी (ता.4) आयोजित करण्यात आलेल्या सभेला येणार नसल्याचा निरोप दिला. काँग्रेसकडून ही सभा उद्या (ता. ५) होणार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे परंतु याला दुजोरा मिळाला नाही.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये सीमाभागातील मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील भाजप आणि कॉंग्रेस नेत्यांना आमंत्रण करून मराठी मते आपल्याकडे वळविण्याचा घाट राष्ट्रीय पक्षांनी घातला आहे.

कॉंग्रेसच्या उमदेवाराचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार अमित देशमुख हे प्रचारासाठी शुक्रवारी बेळगावात दाखल झाले आहेत. सकाळी 10 वाजता येळ्ळूर येथे कॉंग्रेसचे उमेदवार लक्ष्मीनारायण यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. या सभेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण येणार असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाली.

त्यामुळे गावच्या वेशीतच सकाळी आठ वाजल्यापासून गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहू लागले. यावेळी 50 हून अधिक पोलिस गाड्यांचा ताफा उभा करण्यात आला होता. तरी यावेळी पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भेटायचे आहे. आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते असून आमचा अभिमान असल्यास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आम्हाला भेटायची संधी द्यावी. अशी मागणी पोलिसांकडे केली.

पोलिसांनी असा निरोप कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आणि अशोक चव्हाण यांना दिला. यानंतर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आणि चव्हाण यांची एका बंद खोलीच चर्चा झाली. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी मी येळ्ळूरच्या सभेला उपस्थित राहणार नाही. असा खुलासा दिला. त्यामुळे येळ्ळूर येथील आयोजित सभेला चव्हाण आले नाहीत.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election