बेळगाव ग्रामीणमध्ये म. ए. समिती, भाजपला "दे धक्‍का'! 

नागेंद्र गवंडी 
मंगळवार, 15 मे 2018

बेळगाव - बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मराठी भाषिकांचे वर्चस्व असले तरी 2008 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर या मतदारसंघात भाजपने सत्ता मिळवली होती. परंतु, दहा वर्षांनंतर येथील मतदारांनी कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे.

बेळगाव - बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मराठी भाषिकांचे वर्चस्व असले तरी 2008 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर या मतदारसंघात भाजपने सत्ता मिळवली होती. परंतु, दहा वर्षांनंतर येथील मतदारांनी कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात अपेक्षेइतका विकास झाला नसल्याची चर्चा होती. त्यामुळे मतदारांनी कॉंग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पारड्यात मते घातली. त्यामुळे याठिकाणी समिती आणि भाजपच्या पदरी निराशा आली होती. 

बेळगाव ग्रामीणमध्ये म. ए. समिती, भाजप आणि कॉंग्रेस यांच्यामध्ये लढत झाली. पूर्वी उचगाव विधानसभा मतदारसंघ असताना म. ए. समितीचे वर्चस्व होते. यावेळी कॉंग्रेस आणि समिती अशी लढत होत होती; पण 2004 मध्ये भाजपने या मतदारसंघात एंट्री मारली. येथून तिरंगी लढतीला सुरवात झाली. यापूर्वी या मतदारसंघात म. ए. समितीने वर्चस्व मिळवले होते. 2008 मध्ये म. ए. समितीमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मराठी भाषिकांची मते विभागली गेली. याचा फायदा दोन वेळा भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी उचलला. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि म. ए. समिती अशी लढत झाली. कॉंग्रेसनेही 35 हजार मतापर्यंत मजल मारली होती. 

या विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीच्या मतांनाच कॉंग्रेसने सुरूंग लावला. समितीच्या नेत्यांच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून मतदारांनी यावेळी कॉंग्रेसला झुकते माप दिले, तर दुसरीकडे दहा वर्षे सत्तेत असूनही भाजपच्या आमदारांनी म्हणावी तशी विकासकामे केली नसल्याची नाराजी मतदारांत होती. त्यामुळेच मतदारांनी भाजपला सपशेल नाकारले. या निवडणुकीत धक्कादायक कौल देत मतदारांनी कॉंग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकरांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. 

एक नजर 

  • मतदारांची नाराजी भाजपला भोवली 
  • दहा वर्षांची सत्ता खालसा 
  • बेकीच्या राजकारणाचा समितीला फटका 
Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election