कागवाडमध्ये गत २० वर्षांपासून भाजपचा वरचष्मा

सुकुमार बन्नुरे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

कागवाड विधानसभा मतदारसंघाला स्वतंत्र तालुक्‍याचा दर्जा मिळाल्यानंतर यंदा पहिली विधानसभा निवडणूक होत आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार राजू कागे हे सलग चारवेळा निवडून आले आहेत. राज्याच्या सीमेवरील या मतदारसंघावर गेल्या २० वर्षांपासून भाजपचा वरचष्मा आहे. आमदार कागे यांना पाचव्यांदा भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे, मात्र काँग्रेस व धजदचे उमेदवार कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संभाव्य लढती
सलग चारवेळा निवडून गेलेल्या आमदार राजू ऊर्फ भरमगौडा कागे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या आधीपासूनच त्यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाकाही लावला आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेस व धजदकडून कोण टक्कर देणार, याबाबत चर्चा होत आहे.

सन २०१३ च्या निवडणुकीत कागवाड मतदारसंघातून धजदचे उमेदवार म्हणून अटीतटीची लढत दिलेले केंपवाड साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीमंत पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्या वेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांनाच उमेदवारी देण्याचे ठरविल्याचे सांगण्यात येते, मात्र खासदार प्रकाश हुक्केरी यांनी राज्याच्या राजकारणात येण्यासाठी कागवाड मतदारसंघातून उमेदवारी मागितली असल्याची चर्चा आहे, तसेच मंगसुळीचे सरकार म्हणून परिचीत असलेले दिग्विजय पवार-देसाई यांनीही काँग्रेसची उमेदवारी मागितली आहे.

गतवेळच्या निवडणुकीतील मतदान

  • भरमगौडा उर्फ राजू कागे.......भाजप.........४१,७८४
  • किरणकुमार पाटील............ काँग्रेस..........३३,०५७
  • श्रीमंत पाटील.....................धजद............३८,८९७
     

धजदमध्ये प्रवेश केलेले माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीशैल तुगशेट्टी, रूद्रगौडा पाटील, माजी आमदार के. पी. मगेण्णावर यांनीही आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र के. पी. मगेण्णावर यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस व धजदचे उमेदवार कोण? ही चर्चा रंगात आली आहे. कागवाड मतदारसंघात भाजपचा उमेदवार वगळता अन्य पक्षाची उमेदवारी निश्‍चित नसल्यामुळे मतदार व कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

टर्निंग पॉईंट
कागवाड मतदारसंघातून आमदार राजू कागे यांना ‘कांटे की टक्कर’ देणाऱ्या उमेदवाराची चाचपणी काँग्रेस व धजदकडून सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवरच श्रीमंत पाटील यांनी धजदमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना उमेदवारीची खात्री वाटत आहे. दिग्विजय पवार-देसाई हे देखील उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या नावाचीही जोरात चर्चा सुरू आहे. त्यात बाजी कोण मारणार? यावर कागवाडचा राजकीय टर्निंग पॉईंट अवलंबून असणार आहे. ऐनवेळी श्रीमंत पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तर या मतदारसंघात वेगळे चित्र पहावयास मिळणार आहे. धजदही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. माजी आमदार के. पी. मगेण्णावर किंवा श्रीशैल तुगशेट्टी यांना धजदकडून उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे.  

६१ वर्षांचा इतिहास
कागवाड मतदारसंघाला ६१ वर्षांचा इतिहास आहे. सन १९५५ ते १९६१ पर्यंत जयवंतराव पवार, वसंतराव पाटील (व्ही. एल. पाटील), संपतराव तळवळकर हे तिघे कागवाड-अथणी या संयुक्त मतदार संघातून निवडून आले होते. सन १९६२ ते १९७२ काँग्रेस पक्षाच्या चंपाबाई भोगले, १९७२ ते १९७७ आर. डी. कित्तूर-काँग्रेस, १९७८ ते १९८२ ए. बी. जकनूर-काँग्रेस, १९८३ ते १९८८ वसंतराव पाटील-जनता पक्ष, १९८९ ते १९९४ ए. बी. जकनूर-काँग्रेस, १९९४ ते १९९९ मोहन शहा-जनतादल, १९९९ साली पासगौडा पाटील-काँग्रेस, सन २००० ते २०१८ पर्यंत सलग चारवेळा आमदार म्हणन राजू कागे कार्यरत आहेत. 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly election special