सीमाप्रश्‍नी एकोप्याने संघर्ष करूया - धैर्यशील माने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मराठीसाठी कोणत्याही आमिषाला बळी पडून अस्मिता गहाण टाकू नका. सीमालढ्याचा संघर्ष एकोप्याने कायम ठेवूया,` असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी केले.

बेळगाव - `छत्रपती शिवरायांना स्वराज्यनिर्मितीसाठी जिवाला जीव देणारे मावळे मिळाले. त्याचप्रकारे सीमाभागातील मराठी टिकवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यरत आहे. मराठीसाठी कोणत्याही आमिषाला बळी पडून अस्मिता गहाण टाकू नका. सीमालढ्याचा संघर्ष एकोप्याने कायम ठेवूया,` असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी केले.

तालुका म. ए. समितीचा विभागीय युवा मेळावा मंगळवारी (ता. २७) बेळगुंदीतील (ता. बेळगाव) कलमेश्‍वर गल्लीत हुतात्मा चौकाजवळ झाला. त्यावेळी ते प्रमुख वक्‍ते म्हणून बोलत होते. ज्येष्ठ सीमा सत्याग्रही गणपती शहापूरकर अध्यक्षस्थानी होते. मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष रोहित पाटील, जि. पं. माजी सदस्या प्रेमा मोरे, युवा आघाडी अध्यक्ष शाम पाटील, सांगलीचा युवक सुभाषित पाटील व्यासपीठावर होते.

एक सीमावासी- लाख सीमावासी
शरद पवार यांनी सीमाप्रश्‍न सोडविण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. १९८६ च्या कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात त्यांनी नेतृत्व केले होते. १९९२ मध्ये त्यांनी या प्रश्‍नावर तोडगाही काढला होता. पण, आपल्यातील असंतुष्ट लोकांनी त्यामध्ये खोडा घातला. त्यांचा हेतू सर्वांनी ओळखणे आवश्‍यक आहे. आता ३१ मार्च रोजी श्री. पवार बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीसाठीच मेळावा घेणार आहेत. त्यात एक सीमावासी- लाख सीमावासी बनून लाखोंच्या संख्येने मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. किणेकर यांनी केले.

ते पुढे म्हणाले, मराठीसाठी झटणारे शिवरायांचे मावळे सीमाभागातच जास्त दिसतात. शिवरायांनी १२ बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे समितीनेही कर्नाटकने गिळंकृत केलेल्या सीमाभागात मराठीचे अस्तित्व जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. जगाच्या इतिहासात छत्रपती शिवरायांनी सर्वात पहिल्यांदा पहिला मराठी भाषेतून सरकारी कागदपत्रांची रचना केली होती. त्यामुळे, या हक्काच्या लढाईत सीमावासियांनीही कुठेच मागे पडता कामा नये, असे त्यांनी सांगितले. 

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय पक्ष साड्या, भांड्यांचे आमिष दाखवत आहेत. पण, पुढील काळात अस्मिता गहाण ठेवल्यास आयुष्यभर तिच भांडी घासावी लागतील. तेव्हा शिवरायांना स्मरुन आताच स्वाभिमान जागा करा. लढ्याला ठेच पोहचेल अशी कोणतीही कृती करु नका. ज्या छत्रपती शिवरायांचा गौरव साऱ्या जगाने केला. त्यांचाच पुतळा बसविण्यास विरोध करून वैयक्तिक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न काहींनी केला आहे. मराठी तरुणांनी यातून बोध घेऊन एकोप्याने हा संघर्ष पुढे चालू ठेवावा, अशी विनंती श्री. माने यांनी केली.

साडी गेली फाटून, कुकर गेलं फुटून
कार्याध्यक्ष मनोहर किणेकर म्हणाले, ‘सीमाभागातील मराठी माणसांना विकास कसा करायचा हे कुणीही शिकवू नये. स्वत:चा घाम गाळून येथील मराठी माणूस कर भरतो. त्यातूनच विकास साधता येतो. पण, मराठी माणसांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पक्ष साड्या, भांडी, कुकर आणि इस्त्रीचे वाटप करत आहेत. पण, मराठी माणसांच्या अस्मिता आणि स्वाभिमानासमोर ‘साडी गेली फाटून, कुकूर गेले फुटून’ अशी अवस्था झाली आहे. निष्ठावंत मराठी माणसाला कुणीही खरेदी करू शकत नाही.’
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum News Maharashtra Ekikaran Samity conference in Belgundi