बेळगावात हुतात्म्यांना अभिवादनावेळी बंडखोरांबाबत रोष

नागेंद्र गवंडी
शुक्रवार, 1 जून 2018

बेळगाव - महाराष्ट्र एकिकरण समितीचा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे पडसाद आज हुतात्मा दिन कार्यक्रम स्थळावर उमटले. बंडखोरांचा निषेध करण्याबरोबरच येथे आलेले माजी महापौर किरण सायनाक व महापालिका गटनेते पंढरी परब यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. युवा कार्यकर्ते आपल्याकडे येत असल्याचे पाहून त्यांनी येथून काढता पाय घेतला.

बेळगाव - महाराष्ट्र एकिकरण समितीचा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे पडसाद आज हुतात्मा दिन कार्यक्रम स्थळावर उमटले. बंडखोरांचा निषेध करण्याबरोबरच येथे आलेले माजी महापौर किरण सायनाक व महापालिका गटनेते पंढरी परब यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. युवा कार्यकर्ते आपल्याकडे येत असल्याचे पाहून त्यांनी येथून काढता पाय घेतला.

सन 1986 साली कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात हौताम्य पत्करलेल्या हुतात्म्याना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने  हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ शुक्रवारी (ता.1) अभिवादन करण्यात आले. यावेळी सीमाभागातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह युवा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. पण, यावेळी विधानसभा निवडणुकीत अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी केलेल्या नेत्यांना हुतात्मा स्मारकाजवळून हाकलून लावले. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

अभिवादन संपवून नेत्यांची भाषणे सुरू असतानाच समितीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेले नगरसेवक किरण सायनाक तसेच गटनेते पंढरी परब यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे स्मारकास्थळी आगमन झाले. स्मारकाला अभिवादन करून येताच कार्यकर्त्यांनी त्यांना  जाब विचारण्यासाठी थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, बंडखोर थांबले नाहीत. थांबत नसल्यामुळे त्यांच्या मागूून युवा कार्यकर्ते जोरात धावून जात होते. युवक मागे येत असल्याचे पाहून इतर नेत्यांनी त्यांना  येथून जाण्याची सूचना केली. यावेळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. 

मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, सीमाप्रश्‍न सोडविण्यासाठी सीमाभागातील अनेक युवकांनी आपल्या अंगावरती कर्नाटकी पोलिसांच्या गोळ्या झेलल्या आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती म्हणजेच सीमाप्रश्‍न निकालात काढणे आहे. तेव्हा सीमाप्रश्‍न सुटेस्तोपर्यंत रस्त्यावरची लढाई लढत राहून सीमाप्रश्‍न निकालात काढण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद वाढविण्याचा प्रत्येक कार्यकर्त्याने निर्धार करणे गरजेचे आहे.

Web Title: Belgaum News Maharashtra Ekikaran Samity Martyr remembrance