राम मंदिराची वजनदार घंटा तयार करण्यासाठी लागणार चार महिने

पीटीआय
Sunday, 9 August 2020

भारतातील सर्वांत मोठी ठरणारी ही घंटा राम मंदिराला दान केली जाणार आहे.

जलेसर (उत्तर प्रदेश) - मंदिर म्हटले की घंटा हवीच. त्यामुळेच जलेसर शहरातील दाऊ दयाळ आणि त्यांचे कारागिर अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी घंटा बनवत आहे. मात्र ही घंटा ‘वजनदार’ आहे. तब्बल दोन हजार १०० किलो वजनाची घंटा तयार करण्यात दयाळ मग्न आहे. 

सध्या त्यांनी राम मंदिसासाठी भव्य घंटा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.दाऊ दयाळ (वय ५०) हे गेल्या ३० वर्षांपासून हा विविध आकारातील घंटा तयार करीत आहेत. हे काम करणारी त्यांची चौथी पिढी आहे. विशेष म्हणजे ही घंटा इक्बाल मिस्त्री या कारागिराच्या हातातून घडणार आहे. ‘‘आमचे मुस्लिम कारागीर नक्षीकाम, ग्रायडिंग व पॉलिशचे काम करण्यात वाकबगार असता’’ असे दयाळ यांनी सांगितले. एवढ्या भव्य आकारातील घंटेची प्रथमच निर्मिती करीत असल्याचे ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कामाचा आनंद, पण अपयशाची भीतीही 
‘‘एवढ्या मोठ्या आकारातील घंटेचे काम करणे खूप कठीण असते. निर्मिती ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते. शिवाय एकही चूक होऊ न देता काम करणे ही गोष्ट अवघड असते. राम मंदिरासाठी ही घंटा तयार करीत आहोत, याचा आनंद असला तरी अपयशाची भीती सतत मनात असते,’’ असे दयाळ यांनी सांगितले. मिस्त्री म्हणाले की, अशा कठीण कामात यशाची खात्री देता येत नाही. वितळवलेला धातू साच्यात ओतताना पाच सेकंदाचा उशीर झाला तरी सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घंटा राम मंदिराला दान 
‘‘भारतातील सर्वांत मोठी ठरणारी ही घंटा राम मंदिराला दान केली जाणार आहे,’’ अशी माहिती जलेसर नगर पालिकेचे अध्यक्ष व जेथे घंटा तयार होत आहे, त्या कार्यशाळेचे मालक विकास मित्तल यांनी सांगितले. अयोध्येतील जमिनीच्या वादातील एक फिर्यादी निर्मोही आखाड्याकडून या भव्य घंटेचे काम मित्तल यांना दिले आहे. 

घंटेची निर्मिती व वैशिष्‍ट्ये 

  • सुरूवातीच्या नियोजनापासून निर्मितीचे स्वरूप निश्‍चित करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला 
  • धातूच्या एकसंध तुकड्यात तयार होणार 
  • वरपासून खालपर्यंत कोठेही जोड नसणार 
  •  पितळासह अष्ट धातूंचा वापर 
  • सोने, चांदी या मौल्यवान धातूंसह तांबे, जस्त, शिसे, लोखंड, पारा व कथील यांचा वापर 
  • वितळलेले मिश्रधातू साच्यात ओतण्यासाठी क्रेनचा उपयोग 
  • हिंदू व मुस्लीम समाजातील २५ कामगार दररोज आठ तास काम करीत आहेत 
  • घंटेची किंमत २१ लाख रुपये 
  • कार्यशाळेकडून ती मंदिराला दान रूपात देणार 
  • घंटा अयोध्येला रवाना करण्यापूर्वी त्‍यावर शेवटचा हात फिरवणार 

दयाळ यांनी घडविलेल्या घंटा (आकडे किलोत) 

१०१ - केदारनाथ मंदिर 
१,०००  - महाकालेश्‍वर मंदिर (उज्जैन) 
५१  - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेट 

जलेसरची माती वैशिष्टपूर्ण आहे. या मातीत ओतकाम झालेल्या घंटेच्या आवाज चांगला असतो. राम मंदिरासाठी तयार होणाऱ्या घंटेचा आवाज १५ किलोमीटरपर्यंत ऐकू येईल. 
विकास मित्तल, कार्यशाळेचे मालक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bell weighting 2100 kg for the Ram temple in Uttar Pradesh Jalesar town