esakal | ममता बचावल्या कारण तेजस्वी यादवांसारखी केली नाही चूक; जाणून घ्या...

बोलून बातमी शोधा

Mamata_Tejasvi
ममता बचावल्या कारण तेजस्वी यादवांसारखी केली नाही चूक; जाणून घ्या...
sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये आपल्या नंदीग्रामच्या जागेसह राज्यात स्पष्ट बहुमत मिळवत निर्विवाद वर्चस्व राखण्यात यश मिळवलं आहे. त्यांच्या या यशात त्यांनी टाळलेल्या अनेक बाबी महत्वाच्या ठरल्या आहेत. बंगालमध्ये त्यांनी बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी केलेली चूक केली नाही, त्यामुळे त्या बचावल्या आहेत.

यामध्ये ओवेसी फॅक्टर महत्वाचा होता, याचा थेट परिणाम २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत दिसून आला. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षानं खेळ बिघडवला होता. ममता बॅनर्जींनी कुठेतरी ही गोष्ट लक्षात घेतली होती. त्यामुळे जसं ओवेसींनी बंगालच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली तेव्हा तृणमूलच्या अध्यक्षा ममतांनी त्यांना कटशाह देण्याची रणनिती बनवली.

एमआयएमनं बिघडवला होता खेळ

बिहारमधील २०२० मधील निवडणुकीत जेडीयू-भाजपच्या एनडीए आणि आरजेडी-काँग्रेस-डावे यांच्या महागठबंधनमध्ये थेट सामना पहायला मिळाला होता. यामध्ये एनडीएला १२५ तर महागंठबंधनला ११० जागा मिळवता आल्या होत्या. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात मैदानात उतरलेल्या महागठबंधनला सर्वाधिक नुकसान झालं होतं ते सीमांचल येथे. या ठिकाणी ओवेसींच्या एमआयएमनं मोठा खेळ केला होता.

सीमांचल हा आरजेडीचा गड निसटला होता

सीमांचल हा आरजेडीचा मोठा गड मानला जात होता. या भागात किशनगंज, अररिया, पूर्णिया आणि कटिहार हे जिल्हे येतात. यांमध्ये एकूण २४ विधानसभा जागा आहेत. यामध्ये निम्म्याहून अधिक जागांवर मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. एमआयएमनं सीमांचलमधील पाच जागा जिंकल्या होत्या. इतकेच नव्हे राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार, ओवीसींच्या पक्षानं इतर जागांवरही मजबूत स्थिती राखली होती. ज्याचा फटका महागठबंधनला बसला होता. ममता बॅनर्जींना कुठे कुठे ही गोष्ट डोक्यात होती.

ओवेसींवर केली होती वारंवार टीका

ममतांनी सुरुवातीपासूनच बंगालच्या मतदारांमध्ये ओवेसींच्या प्रवेशाबाबत आपलं मत मांडायला सुरुवात केली. भाषणांतून तसेच मुस्लिम मतदारांना आपल्या बाजून वळवण्यासाठीची रणनीती याचा यात समावेश होता. ममतांनी ओवेसींवर थेटपणे किंवा नाव न घेता आपल्या भाषणातून हल्ले चढवले. त्यांनी एकदा म्हटलं की, "एक माणूस हैदराबादहून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाला आहे त्याने भाजपकडून पैसे घेतले असून त्यांना मदत मिळावी म्हणून आपल्या पक्षाचे उमेदवार इथे उतरवले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यांना बंगालमध्ये पाय रोवण्याची परवानगी आपल्याला द्यायची नाही" याद्वारे त्या मुस्लिम मतदारांना आपल्यासोबत ठेवण्यात यशस्वी ठरल्या. नेमकी हीच चूक बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी केली होती. जी ममतांनी टाळली आणि विजय मिळवला.