दिल्ली ते बेंगळुरू हिंसाचाराचं असंही कनेक्शन; 7 FIR मध्ये 16 जणांची नावे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

दोन दिवसांपूर्वी बेंगळुरूत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी सात एफआयआर दाखल केले आहेत.

बेंगळुरू - दोन दिवसांपूर्वी बेंगळुरूत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी सात एफआयआर दाखल केले आहेत. दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल केलेल्या या गुन्ह्यामध्ये सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या 16 जणांची नावे आहेत. मंगळवारी रात्री झालेल्या हिसाचारामध्ये अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. काँग्रेस आमदारांच्या नातेवाइकाने केलेल्या सोशल मीडिया पोस्टनंतर हा प्रकार घडला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, DJ हाली आणि KG हाली पोलिस ठाण्यांमध्ये एफआय़आर दाखल करण्यात आला आहे.  300 जणांनी हल्ला केल्याचं यामध्ये म्हटलं आहे. यापैकी 16 जणांची ओळख पटली असून ते एसडीपीआयचे कार्यकर्ते असल्याचं समोर आलं आहे. संशयितांविरोधात कलम 143, कलम 147, कलम 103, 332 आणि 333, 353, 427 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. सात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. डीजे हाली पोलिस स्टेशनमध्ये नवीन पी नवीन यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांनी दोन धर्मात तेढ निर्माण होइल असं कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांनी म्हटलं की, फेसबुक कमेंट मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास करण्यात आली होती. 

पोलिसांनी बुधवारी या प्रकरणी 145 लोकांना ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्ही फूटेजवरून लोकांची ओळख पटवली जात आहे. आणखी काहींना ताब्यात घेण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, एसडीपीआयने आपला याप्रकरणात काहीही संबंध नसून चुकीचे आरोप केले जात असल्याचं म्हटलं आहे. 

हे वाचा - बंगळुरु हिंसाचाराची घटना कटाचा भाग असू शकते, राजकारण्यांचा हात असल्याचा होतोय आरोप

सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच एसडीपीआय हा कट्टर मुस्लीम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष आहे. पीएफआय संघटनेवर सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलनावेळी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात हात असल्याचा आरोप आहे. दिल्लीत 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी याकाळात हिंसाचार झाला होता. तेव्हा दिल्ली पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या अहवालात पीएफआय या हिंसाचारामागे असल्याचं म्हटलं होतं. 

कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये धार्मिक वाद पेटला होता. काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून  संपूर्ण जगाला शांती आणि समतेचा संदेश देणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यानंतर अल्पसंख्यांक समुदायाने संतप्त होऊन तोडफोड केली होती. यामध्ये काँग्रेस आमदाराच्या घराची तोडफोड आणि वाहने जाळपोळीचा प्रकार घडला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bengluru police 7 fir in 2 police station 16 accused identify