बंगळुरु हिंसाचाराची घटना कटाचा भाग असू शकते, राजकारण्यांचा हात असल्याचा होतोय आरोप

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 12 August 2020

पत्रकार, जनता आणि पोलिसांवर कारवाई करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

बंगळुरु : सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये धार्मिक वाद पेटला आहे. काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून  संपूर्ण जगाला शांती आणि समतेचा संदेश देणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यानंतर अल्पसंख्यांक समुदायाकडून संतप्त पावले उचलण्यात आली. काँग्रेस आमदाराच्या घराची तोडफोड आणि वाहने जाळपोळीचा प्रकार घडला. या प्रकरणातील गुन्हेगांराची गय केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिली आहे. या हिंसाचाराच्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. 

Bengaluru riots : धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवरुन वादंग, तिघांचा मृत्यू तर 110 जण अटकेत

पत्रकार, जनता आणि पोलिसांवर कारवाई करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.  बंगळुरुमध्ये झालेल्या हिंसाचाराचा काँग्रेसकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. कर्नाटकमधील काँग्रेस प्रमुख डीके शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावरील एका व्यक्तीच्या पोस्टमुळे हिंसाचार घडला. या कटात सहभागी असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकारच्या आवश्यक ते सहकार्य करु, असे काँग्रेसने म्हटले आहे. यासंदर्भात काँग्रेस आमदारांची बैठक बोलवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.  

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिला कोरोना मंत्र!

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री  देवेगौंडा यांनी देखील घटनेचा निषेध नोंदवला आहे. ही घटना कट कारस्थानाचा एक भाग असू शकते, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक राजकारणातील सत्ता संघर्षामुळे या घटनेला बळ मिळाले असावे, असेही त्यांनी म्हटले आहे.  भाजपा महासचिव अश्वथ नारायण यांनी या घटनेत एसडीपीआय (सोशल डोमेस्टिक पार्टी ऑफ इंडिया) आणि पीएफआय (पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया) या दोन पक्षांचा हात असल्याचा आरोप केला आहे. राम मंदिरासंदर्भातील ऐतिहासिक निर्णय आणि नुकतेच आयोध्येत भव्य राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली असावी, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress BJP JD condemn Bengaluru riots say may be incidite planned