

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath announces the renaming of Bhadohi district as Sant Ravidas Nagar.
esakal
उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा ‘संत रविदास नगर’ करण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. भदोही येथील कार्पेट एक्स्पो मार्टमध्ये आयोजित ५० व्या इंडिया कार्पेट एक्स्पोच्या उद्घाटनावेळी त्यांनी ही घोषणा केली. संत रविदास यांच्या ६५० व्या जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
४ ते ७ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या कार्पेट एक्स्पोमध्ये देश-विदेशातील खरेदीदार सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात सुमारे २५० प्रदर्शक आणि ६५ देशांतील ४५० हून अधिक परदेशी खरेदीदार सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.
१९९४ पासून पाचव्यांदा जिल्ह्याचे नामांतर
भदोही हा पूर्वी वाराणसी जिल्ह्याचा भाग होता. ३० जून १९९४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या सरकारने वाराणसीचे विभाजन करून भदोही हा स्वतंत्र जिल्हा तयार केला.
त्यानंतर जिल्ह्याच्या नावात अनेकदा बदल झाले. ४ डिसेंबर १९९७ रोजी मायावती यांच्या सरकारने जिल्ह्याचे नाव ‘संत रविदास नगर’ केले. त्यानंतर १२ नोव्हेंबर १९९९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री रामप्रकाश गुप्ता यांच्या कार्यकाळात ‘संत रविदास नगर भदोही’ असे संयुक्त नाव करण्यात आले.
६ डिसेंबर २०१४ रोजी अखिलेश यादव यांच्या सरकारने पुन्हा ‘भदोही’ हे नाव बहाल केले. आता २०२६ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्ह्याचे नाव पुन्हा ‘संत रविदास नगर’ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या निर्मितीनंतर नाव बदलण्याची ही पाचवी वेळ ठरली आहे.
संसद भवनातील गालिच्यांचाही मुख्यमंत्र्यांनी केला उल्लेख
योगी आदित्यनाथ यांनी भदोहीच्या कार्पेट उद्योगाच्या योगदानाचा उल्लेख करताना नवीन संसद भवनात अंथरलेले गालिचे याच परिसरातील कारागिरांनी तयार केल्याचे सांगितले. स्थानिक विणकर आणि कारागिरांच्या कौशल्यामुळे भदोहीला जागतिक ओळख मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
संत रविदास नगर, मिर्झापूर आणि वाराणसी या सिल्क व कार्पेट क्लस्टरचा देशाच्या गालिचा निर्यातीमध्ये मोठा वाटा असल्याचे सांगण्यात आले. या क्लस्टरमधून दरवर्षी सुमारे रु. ६,१०० कोटींची गालिचा निर्यात होत असल्याचा दावा करण्यात आला.
येथील हस्तनिर्मित गालिच्यांची मोठ्या प्रमाणावर अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये निर्यात केली जाते. या पारंपरिक उत्पादनांना जीआय टॅगही मिळाला आहे.
२,५०० हून अधिक उद्योग, लाखो कारागिरांना रोजगार
भदोही परिसरात २,५०० हून अधिक एमएसएमई युनिट्स कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. या उद्योगांची वार्षिक उलाढाल सुमारे रु. १० हजार कोटी असल्याचा दावा करण्यात आला असून, कार्पेट उद्योगामुळे पाच लाखांहून अधिक कारागीर आणि कामगारांना रोजगार मिळत असल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशातील बदललेल्या कायदा-सुव्यवस्थेचाही उल्लेख केला. २०१७ पूर्वीच्या काळात दंगली, कर्फ्यू आणि माफियागिरीमुळे उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत होता, असा दावा त्यांनी केला. आता सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यामुळे परदेशी खरेदीदार उत्तर प्रदेशात येत असून, स्थानिक कारागिरांना त्यांच्या मातीतच काम करण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
लखनौ-हरदोईदरम्यान पीएम मित्र टेक्स्टाईल पार्क
उत्तर प्रदेशातील वस्त्रोद्योगाला आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी लखनौ आणि हरदोईदरम्यान सुमारे १ हजार एकर क्षेत्रावर पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क उभारला जात आहे.
याशिवाय स्थानिक उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सरदार वल्लभभाई पटेल एम्प्लॉयमेंट अँड स्किलिंग झोन’ उभारण्याचे काम सुरू आहे.
भदोहीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्पेट टेक्नॉलॉजी (IICT)च्या माध्यमातून कारागिरांना डिझाईन, आधुनिक डायिंग तंत्रज्ञान आणि उत्पादनाशी संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. पारंपरिक कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेची जोड देऊन कार्पेट उद्योगाला आणखी बळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.