esakal | केंद्रीय मंत्री भागवत कराडांची पंकजा मुंडेंविषयी पहिली प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय मंत्री भागवत कराडांची पंकजा मुंडेंविषयी पहिली प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री भागवत कराडांची पंकजा मुंडेंविषयी पहिली प्रतिक्रिया

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भगिनी प्रीतम मुंडे यांना न घेतल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचे सांगितले जात होतं. यामुळे बीड जिल्ह्यात नाराजीचं वातावरण असून राजीनामासत्र सुरु आहे. अशातच पंकजा मुंडे दिल्लीला गेल्यामुळे चर्लेला उधाण आलं होतं. आता पंकजा मुंडेविषयी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर भागवत कराड यांनी पंकजाविषयी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिल्लीत पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. पंकजा मुंडे यांची भेट घेतली, मन मोकळं केलं, असं म्हणत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. कराड यांच्या ट्विटनंतर पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलंय.

खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्री बनवण्यात आलं. त्यामुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यात, दोन दिवस प्रतिक्रिया न दिल्याने, नाराजीच्या चर्चेला अधिक बळ मिळालं होतं. मात्र, पंकजा मुंडे दिल्लीत पोहचल्यानंतर भागवत कराड यांच्यासोबत जवळपास तासभर चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी भागवत कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. भागवत कराड ट्विट करत या भेटीची माहिती दिली.

काय म्हटलेय ट्विटमध्ये?

“आज (12 जुलै) पंकजा मुंडे दिल्लीमध्ये बैठकीसाठी आल्या. त्यांची भेट घेतली. मन मोकळे झाले. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत. त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या.”

भगिनी प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात न घेतल्याने नाराज असल्याचे सांगितले जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्या पंकजा मुंडे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. माजी मंत्री विनोद तावडे आणि महिला आघाडीच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर याही त्यांच्याबरोबर होत्या. मात्र पंतप्रधानांनी पंकजा मुंडे यांना स्वतंत्ररीत्या भेट दिली नसून राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत सहभागी झालेल्या सर्वांनाच पंतप्रधान यांनी आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले होते, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. त्यात महाराष्ट्रातून डॉ. भागवत कराड आणि डॉ. भारती पवार या नवोदितांना मोदी यांनी संधी दिली. संभाव्य नावांमध्ये पंकजा यांच्या भगिनी आणि खासदार प्रीतम मुंडे यांचेही नाव होते. त्यांचा समावेश मंत्रिमंडळात न झाल्याने मुंडे भगिनी नाराज आहेत असे सांगितले जाते. पंकजा मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ‘आम्ही नाराज नाही, कार्यकर्ते नाराज आहेत’ असे सांगितले होते. त्यानंतर बीडमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.

loading image